प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
गडचिरोली, २७ जून : जिल्ह्यातील एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दुचाकीने जात असताना दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीची झाडाला धडक होऊन झालेल्या अपघातात मामा व भाची ठार झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावाजवळ घडली. नथ्थू पुस्सु हिचामी (२५), रा. जीवनगट्टा असे मामाचे तर रोशनी बंडु पदा (२२), रा. पिपली (बुर्गी) असे भाचीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नथ्थू हिचामी हा कामानिमित्त बहिणीच्या घरी
पिपली (बुर्गी) गावात बहिणीला भेटायला गेला होता. दरम्यान तो
आपल्या गावी जिवनगट्टा येथे परत येण्याकरिता निघाला असता
नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात
प्रवेश घ्यायचा असल्याने ती नत्थु सोबत एटापल्लीपर्यंत येण्यासाठी
नथ्थूच्या दुचाकीवर बसली. दरम्यान पिपली (बुर्गी) येथून निघाल्यानंतर
गावाजवळून चार किमी अंतरावर असलेल्या वेलमागड गावाजवळ
दुचाकीची झाडाला धडक बसली. यामध्ये मामा व चुलत भाची गंभीर जखमी झाले यावेळी मामाला रुग्णालयात नेण्यासाठी भाची मार्गाने ये-जा करणाऱ्यांना विनवणी करीत होती मात्र मामा नथ्थू हिचामी हा
जागेवरच ठार झाला होता तर भाचीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू
झाला. ह्या हृदयद्रावक घटनेने रोशनी चे पुढील शिक्षण आणि
आयुष्यातील स्वप्न अपूर्णच राहिले. सदर घटना मन हेलावणारी
असल्याने गावत व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून गावावर
शोककळा पसरली आहे.

