सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही!
रमाबाई आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजीवनाचे रमाबाई आंबेडकर अविभाज्य अंग होत्या. रमाबाईंना केवळ 37 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांनी तब्बल 27 वर्षे बाबासाहेबांचा संसार रेटला. या काळात रमाबाईंना अनेक यातनांना तोंड द्यावे लागले. दारिद्र्य हे तर पाचवीलाच पूजलेले होते. बाबासाहेब अभ्यासासाठी प्रदेशात असल्याने रमाबाईच्या वाट्याला एकटेपणा आला. त्यातच त्यांच्या वर अनेक दुःखद प्रसंग ओढवले. त्यांनी सासऱ्याचा मृत्यू पाहिला, बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचा मृत्यू पाहिला. स्वतःच्या पोटच्या गोळ्यांचा मृत्यूही त्यांनी पाहिला. गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न या मुलांच्या मृत्यू समयी रमाबाईची झालेली तगमग शब्दात वर्णन करण्या पलीकडची आहे.
बाबासाहेब कोलंबीया विद्यापीठात असताना रमाईचे खूप हाल झाले. बाबासाहेबांना याची कल्पना होती. त्यांनी कोलंबीयाहुन रमाबाईना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते की ; " मी वणव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करिन. तिथल्या गुलामीची कबर बांधीन.
भारतात जाती प्रथा, स्पृश्य -अस्पृश्यता अशा जोखडात समाज गुरफटला होता. मात्र कोलंबीयात समाज प्रगत होता. रमाबाईला ते लिहितात, इथं माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. या गोष्टीने मन उत्साहाने भरून येते. इथे अस्पृश्यता नाही, जाती -वर्ण नाहीत. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे, अस मला वाटतं.
पत्राच्या उत्तरात रमाबाई म्हणतात ; " आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहीन. काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागे हटणार नाही. याची आपण खात्री बाळगावी ".
1913 ते 1917 या काळात रमाबाईंचे खूप हाल झाले. संसार चालविण्यासाठी त्यांना कष्टाची कामे करावी लागली. बाबासाहेब परदेशात जाताना त्या गर्भवती होत्या. नंतर या मुलाचा जन्म झाला. रमेश हे त्याचे नाव ;परंतु वर्षाच्या आतच त्याचा मृत्यू झाला. रमाबाईंनी ही दुःखद वार्ता बाबासाहेबांना पत्राने कळविली. त्या लिहितात अत्यंत दुःखाची बातमी आहे. रमेश आपल्याला सोडून गेला. त्याच्या आजाराच मुद्दाम तुम्हाला कळवलं नव्हतं. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहचू नये एवढ्यासाठी तुम्हाला कळविले नाही, त्याची क्षमा मागते. इतक सगळं सोसत आहेच त्यात हा आघात. कुठून शक्ती आणावी ? पन तुम्हाला एवढीच विनंती की ; हे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवून द्या. तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका. जेवणाची आबाळ होऊ देऊ नका. तब्बेतीची काळजी घ्या. मजा इकडे सर्व सांभाळते. रमाबाई आंबेडकर यांच्या संदर्भात डॉ. यशवंत मनोहर "रमाई "कादंबरीत म्हणतात,
करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेत ही
शब्दशिवाय मैफल तू मावत नाहीस स्वरातही
डोळ्यात व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही
आर्ततेची सदाफुली तू मावत नाहीस अश्रूतही
सूर्या सोबत संसार तुझा चांदणे झालीस आगीतही
सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही !
- प्रा. डी.के. साखरे
डोंगरगाव
ता.मंगळवेढा

