तिन वर्षाच्या बालकाचा देवदत्त बनला मजूर

0
 तिन वर्षाच्या बालकाचा देवदत्त बनला मजूर 


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता 

कोल्हापुर (चंदगड): आयुष्याची दोरी बळकट असेल तर मृत्यू दारातून परत जातो असे म्हणतात या उदाहरणाला साजेल अशी आणि अंगाचा थरकाप उडवणारी घटना पाटणे फाटा कार्वे येथे पाहण्यास मिळाली 
१०० फूट खोल आणि २५ फूट पाणी असणाऱ्या विहिरीत तीन वर्षांचा एक मुलगा पडला. त्या मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात • उतरलेला मजूर त्या मुलाला दोरीच्या सहाय्याने वर येत असताना निम्म्यात आल्यावर दोर तुटला अन् पुन्हा ते दोघे विहिरीत कोसळले. अखेर तिसरा एक जण या दोघांच्या मदतीस धावला. अशा प्रकारे दोघा तरुणांनी जीवाची बाजी लावत ३ वर्षाच्या कोवळ्या मुलाचा जीव वाचवला. ही थरकाप उडवणारी घटना पाहायला बघ्याची गर्दी जमली होती व यांच्या काळजाचा ठोका चुकला होता.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्ती प्रमाणे अवघ्या तीन वर्षांचा आयुष अनंत तुपारे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. अनंत तुपारे यांचे पाटणे फाट्यावर किराणाचे दुकान आहे. दुकानाच्या मागे त्यांचे राहते घर व त्या आवारात त्याची १०० फूट खोल असणारी विहीर आहे. अनंत तुपारे यांचा मुलगा आयुष हा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. खेळता-खेळता सर्व मुले विहिरीतील पाणी पाहू लागले. दरम्यान आयुषचा पाय घसरला व तोल जाऊन विहिरीत पडला.

आयुष विहिरीत पडताच इतर मुलांनी आरडा-ओरडा सुरु केली. शेजारी एका इमारतीच्या बांधकाम सुरु आहे. येथे सेंट्रिंगचे काम करणाऱ्या राहुल कातकर (वय ४०, रा. आंबेवाडी, ता. जि. बेळगाव) या तरुणाने मुलांचा आवाज ऐकत विहिरीजवळ पोहचला. क्षणाचाही विलंब न लावता राहुलने दोर लावत विहिरीत उतरला. या काळात आयुष पाण्यात गटांगळ्या खात होता. राहुल पटकण पाण्यात उतरला व आयुषला त्याने पकडले. दोघे दोरीच्या सहाय्याने वर चढू लागले. निम्म्यात आल्यावर दोर तुटला अन् दोघे पुन्हा पाण्यात कोसळले. यावेळी बघ्यांचा थरकाप उडाला.

ही घटना पाहूण गर्दीतील दुसरा तरुण राहुल कांबळे (रा. जंगमहट्टी, ता. चंदगड) विहिरीत झरझर उतरला आणि आयुषला घेऊन वर आला. त्यानंतर गंभीर जखमी झालेला राहुल कातकर वर आला. पोहून पोहून त्याच्या अंगात त्राण उरला नव्हता. विहिरीत घाई गडबडीत उतरताना त्याच्या हाता पायाला, - शरीरावर जखमा झाल्या होत्या.

या सर्व घटनेत राहुल कातकरचा मोबाईल पाण्यात पडला. आयुषच्या वडिलांनी त्याला तात्काळ नवीन मोबाईल दिला. मात्र त्याने तो नाकारला. मोबाईल अनेक घेता येतील पण बालकाचा जीव परत मिळवता आला नसता अशी प्रतिक्रिया कातकरने यावेळी दिली. मोलमजुरी करणाऱ्या कातकरला अनेकांनी बक्षीस देऊ केले. पण, त्याने ते नम्रपणे नाकारले. बलवत्तर म्हणूनच आयुष मरणाच्या दारातून परत आल्याची आणि राहुलच्या धाडसाची चर्चा घटनास्थळी रंगली होती.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !