प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता
अकोला: राज्यात आज अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसामुळे विदर्भ विभागातील अकोला जिल्हा येथील पारसगाव या ठिकाणी येथे मोठी दुर्दैवी घटना घडली.यामुळे आता राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका मंदीराच्या शेडवर झाड कोसळल्याचा घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.तसेच या शेडखाली २० ते २५ भाविक अडकून पडल्याची भिती व्यक्त होत आहे. यातून पाच जणांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे मंदीराच्या शेडवर अचानक पडलेल्या या झाडामुळे ही मोठी दुर्घटना घडली. कोसळलेलं हे झाड हटवण्यात मोठी समस्या निर्माण होत होती. आज सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अकोल्यातील गावात बाबूजी महाराजांचं मंदीर आहे. यामुळे येथे रविवारी रात्री मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते. नेमक्या याचवेळी अवकाळी पावसामुळे मंदिराच्या बाजूला असलेलं जुनं निंबाचं मोठं झाड या शेडवर पडलं.
दरम्यान, या दुर्घटनेच्या ठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत चार मृत्यू झाल्याचा आकडा समोर येत आहे. मात्र शेडखाली अजूनही लोक दबलेले आहेत. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.