दरेकसाजवळील घटना ; बॉम्ब शोधक पथकात होते कार्यरत
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
गोंदिया, ११ डिसेंबर :- वंदे भारत रेल्वे गाडीची सुरक्षा म्हणून नक्षलग्रस्त भागात सर्चिंग करण्यासाठी गेलेल्या बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या पोलिस कर्मचाऱ्याचा रेल्वेने कटून मृत्यू झाला. ही घटना १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नसीने बक्कल नंबर १२४ असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
नसीने हे गोंदियाच्या बॉम्ब शोध व नाशक कार्यरत पथकात होते. ११ नोव्हेंबर रोजी बंदे भारत ही गाडी नागपूर ते बिलासपुर धावणार असल्याने ही गाडी गोंदिया जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागातून जात असल्यामुळे गोंदियाचे बॉम्ब शोध व नाशक पथक घातपात होऊ नये, यासाठी रेल्वे रूळ तपासण्यासाठी गेले होते. १० डिसेंबर रोजी ते सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा हद्दीत तपासणी करत असताना दरभंगा या गाडीने नसीने यांना धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या तब्बल ९२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व दीडपट वेतनापासून वंचित ठेवले आहे. यात विजय नसीने यांचाही समावेश आहे.
नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात काम करणाऱ्या पोलिसांना शासन दीडपट वेतन देते. परंतु, तत्कालीन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी एप्रिल २०२१पासून आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात श्वान पथक, बीडीडीएस पथक, एटीसी, जेटीएससी व नक्षल सेल अंतर्गत प्रपोगंडा सेल, इंटरसेप्शन सेल, नक्षल ऑपरेशन सेल, इंटर सेल, टेक सेल यांचे दीडपट वेतन बंद केले आहे. बीडीडीएस पथकात विजय नसीने काम करत असताना त्यांना दीडपट वेतन देण्यात आले नाही. जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या पोलिसांना दीडपट वेतनापासूनही वंचित ठेवण्यात आले आणि धोक्याच्या ठिकाणी कामावर पाठविणे हे न्याय संगत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.

