उपसरपंचासह तीन सदस्य अपात्र
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
ब्रम्हपुरी तालुक्यातील कालेता ग्रामपंचायत चे उपसरपंच यांच्या सह ग्रामपंचायत च्या तीन सदस्यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. यामध्ये उपसरपंच नरेश्चंद्र पांडुरंग राऊत सदस्या सुनंदा जयभीम पिल्लेवान, भारती रवींद्र पानसे, उत्तरा विजय सोनटक्के यांचा समावेश आहे. वरील सर्व सदस्य फेब्रुवारी २०२० च्या सार्वत्रिक निवडणूकित विजयी झाले होते. सन २०२१-२२ मध्ये ग्रामपंचायतने सर्व सदस्यांना गृह कर व पाणीपट्टी कर भरण्याची मागणी बिल दि. १८ जुन २०२१ ला दिले. सदर मागणी बिल सर्व सदस्यांनी स्वीकृत केले. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार सर्व सदस्यांना मागणी बिल मिळाल्यापासून ९० दिवसाच्या आत
गृह कर व पाणीपट्टी कर भरणे अनिवार्य असते. परंतु वरील सदस्यांनी आपल्या सत्तेला व पदाला जास्त महत्व देऊन गृह कर व पाणीपट्टी कर भरण्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ग्रामपंचायत कालेता येथील सदस्य अमितकुमार भीमराव बनकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे उपसरपंचासह तीन सदस्यांविरोधात तक्रार अर्जाचे प्रकरण दाखल केले. योग्य कागदपत्रे व पाठपुरावा केला. शेवटी जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरण निकाली काढत १० ऑक्टोंबर २०२२ ला उपसरपंचासह तीन सदस्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ह) चे उल्लंघन केल्याचे घोषित करून त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पद रद्द केले. ग्रामपंचायत सदस्य अमितकुमार बनकर यांच्या तर्फे अॅड. विनोद ठाकरे यांनी बाजू मांडली.

