घोटला अपर तहसील कार्यालय मंजूर; मग आष्टीकरांच्या स्वतंत्र कार्यालयाच्या आश्वासनाचे काय?

0
घोटला अपर तहसील कार्यालय मंजूर; मग आष्टीकरांच्या स्वतंत्र कार्यालयाच्या आश्वासनाचे काय?

घोटला जाण्यासाठी एसटीची एकच बस; काम न झाल्यास नागरिकांनी परत यायचे कसे? आमदारांच्या भूमिकेवर आष्टीकरांचा सवाल!


आष्टी : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास राज्य शासनाच्या महसूल विभागाने २२ नोव्हेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर आष्टी परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या निर्णयानुसार आष्टी महसूल मंडळाचा समावेश घोट येथील अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आल्याने आष्टीकरांच्या स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाच्या मागणीचे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, घोट येथे अपर तहसील कार्यालय मंजूर झाल्यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत आष्टीवर अन्याय होऊ देणार नाही, तसेच आष्टीसाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालय मंजूर करण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगितले आहे. मात्र, केवळ आश्वासन न देता प्रत्यक्षात आष्टीसाठी स्वतंत्र कार्यालय मंजूर करून आणण्यासाठी आमदार कितपत ठोस प्रयत्न करणार, असा सवाल आष्टी सर्कलमधील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एसटीच्या एका बसवर नागरिकांचा प्रवास अवलंबून!

आष्टी सर्कलमधील नागरिकांसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो वाहतुकीचा. आष्टी परिसरातून घोट येथे जाण्यासाठी सकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकच बस उपलब्ध असल्याचे नागरिक सांगतात. तर सायंकाळी परतीसाठीही एकच बस असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

महसूल विभागाच्या कामासाठी एखादा नागरिक सकाळी घोट येथे गेला आणि त्याचे काम त्याच दिवशी पूर्ण झाले नाही, तर त्याने परत आष्टीला यायचे कसे? दुसऱ्या दिवशी पुन्हा घोटला जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय कोण सहन करणार? आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना या व्यवस्थेचा किती त्रास सहन करावा लागेल, याचा विचार शासनाने केला आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आष्टी सर्कलचा समावेश घोटमध्ये; मग स्वतंत्र कार्यालयाचे आश्वासन कितपत खरे?

शासनाच्या निर्णयानुसार घोट अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात घोटसह आष्टी महसूल मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आष्टीतील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी घोट येथे जावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, आष्टी हे भौगोलिकदृष्ट्या आणि नागरिकांच्या दैनंदिन सोयीच्या दृष्टीने स्वतंत्र अपर तहसील कार्यालयासाठी योग्य ठिकाण असल्याची स्थानिकांची भूमिका आहे.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आष्टीसाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले असले, तरी तो प्रस्ताव नेमका कधी पाठविला जाणार? शासनाकडून मंजुरी मिळविण्यासाठी कोणत्या स्तरावर पाठपुरावा होणार? तसेच आष्टी सर्कलमधील जनतेला दिलासा कधी मिळणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

आष्टीकरांना आता आश्वासन नव्हे, ठोस निर्णय हवा!

आष्टी अपर तालुक्याच्या मागणीसाठी यापूर्वीही नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि संघर्ष समितीने आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, आता घोट येथे अपर तहसील कार्यालयाला मंजुरी मिळाल्याने आष्टीकरांच्या आंदोलनाला पुन्हा धार येण्याची शक्यता आहे.

लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या आमदारांच्या प्रतिक्रियेमुळे आष्टीकरांच्या अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत. परंतु, स्वतंत्र अपर तहसील कार्यालयासाठी प्रत्यक्ष प्रस्ताव, शासनस्तरावरील पाठपुरावा आणि अंतिम मंजुरी या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

घोटला अपर तहसील कार्यालय मंजूर झाले, पण आष्टीकरांच्या स्वतंत्र कार्यालयाचे काय? आमदारांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरविणार की आष्टीकरांना पुन्हा प्रतीक्षेत ठेवणार? हा प्रश्न आता आष्टी सर्कलमधील जनतेसमोर उभा ठाकला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !