रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निमगावला भेट - तहसीलदारांवर कारवाईची मागणी
गडचिरोली - अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व अन्य पदाधिकाऱ्यांनी धानोरा तालुक्यातील निमगाव येथे भेट देऊन बौद्ध बांधवांशी चर्चा केली. गावातील पंचशील ध्वज हटवल्याच्या प्रशासनाच्या कृतीचा तीव्र निषेध करीत धानोरा तहसीलदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी ध्वज स्थळाची पाहणीही करण्यात आली.
निमगाव येथील बौद्ध बांधव मागील पाच-सहा वर्षांपासून गावाजवळील मोकळ्या शासकीय जागेत पंचशील ध्वजाची स्थापना करून तेथे दरवर्षी सामाजिक, धार्मिक कार्यक्रम साजरे करीत होते. या ध्वजामुळे कोणालाही अडचण किंवा अडथळा नव्हता, असा दावा बौद्ध समाजाने केला आहे. ही जागा बौद्ध समाजाला मंजूर करावी, अशी रीतसर मागणीही समाजाने महसूल प्रशासनाकडे अनेकदा केल्याचे सांगण्यात आले.
मात्र धानोऱ्याच्या तहसीलदारांनी पोलीस बळाचा वापर करून मनमानी पद्धतीने पंचशील ध्वज उपडून नेला व बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या, असा आरोप रिपब्लिकन पक्षाने केला आहे. तहसीलदारांची ही कृती अन्यायकारक व चुकीची असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने केली.
दरम्यान, बौद्ध बांधवांनी संयम राखावा व गावातील वातावरण शांत ठेवावे, असे आवाहनही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.
या भेटीवेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, जिल्हा अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, जिल्हा उपाध्यक्ष दुर्योधन सहारे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे यांच्यासह बौद्ध समाजाचे पदाधिकारी लालाजी वासनिक, प्रशांत नगराळे, राहुल वासनिक, गुलाब हुमणे, लोकमित्र बारसागडे, भगवान खोब्रागडे, विनोबा रामटेके, रोशन रामटेके, केशव खोब्रागडे, महिला मंडळाच्या शीतल मेश्राम, कल्पना खोब्रागडे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

