वाघोली शिवारातील खुनाचा उलगडा लवकरच? मृताची ओळख पटली; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

0
वाघोली शिवारातील खुनाचा उलगडा लवकरच? मृताची ओळख पटली; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना




चामोर्शी : चामोर्शी-मुल मार्गावरील वाघोली शिवारात सोमवारी (दि. ७) रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने डोक्यात वार करून करण्यात आलेल्या खुनाच्या घटनेतील मृताची अखेर ओळख पटली आहे. नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (वय ३४), रा. तेली मोहल्ला, वॉर्ड क्रमांक ५, श्रीराम मंदिराजवळ, मुल, जि. चंद्रपूर असे मृताचे नाव असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान, मंगळवारी मृताचे नातेवाईक चामोर्शी येथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिस तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
मात्र, नंदकिशोर मिश्रा यांचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ कायम असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
खुनाचा छडा लावण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मृताच्या नातेवाईकांसह काही संशयितांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संशयितांच्या हालचालींच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली जात आहेत.
लवकरच या खुनामागील कारण आणि आरोपीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !