चंद्रपूर दीक्षाभूमी : मुक्तीचा एल्गार आणि संघर्षाचे नवपर्व - अनिल बारसागडे
गडचिरोली:-
इतिहासाच्या पानावरील अक्षरे जेव्हा जिवंत होतात, तेव्हा तो केवळ इतिहास राहत नाही; तो लाखो जणांच्या अस्मितेचा, निष्ठेचा आणि क्रांतीचा हुंकार बनतो.
१६ ऑक्टोबर १९५६ ची ती ऐतिहासिक पहाट... बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाखातर आणि श्रद्धेखातर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या याच पावन भूमीत सुमारे तीन लाख अनुयायांना धम्मदीक्षा दिली. बाबासाहेबांच्या हयातीतील हा शेवटचा धम्मदीक्षा सोहळा!
चंद्रपूरची ही दीक्षाभूमी म्हणजे केवळ एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार नाही, तर ती कोट्यवधी बौद्ध-आंबेडकरी जनतेच्या श्वासाचे, स्वाभिमानाचे आणि वैचारिक क्रांतीचे ऊर्जाकेंद्र आहे.
परंतु, अत्यंत खेदाची आणि तितकीच संतापाची बाब म्हणजे, ज्या पवित्र भूमीने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा संदेश दिला, तीच दीक्षाभूमी आज मागील ३६ वर्षांपासून घराणेशाही आणि अकार्यक्षमतेच्या साखळदंडांत जकडली गेली आहे.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर' या संस्थेवर गेल्या साडेतीन दशकांपासून एकाच कुटुंबाचे आणि त्यांच्या मर्जीतील लोकांचे वर्चस्व आहे. या ३६ वर्षांत दीक्षाभूमीचा जो सर्वांगीण विकास व्हायला हवा होता, तो पूर्णपणे खुंटला आहे. सर्वसामान्य अनुयायांच्या श्रद्धेचा वापर करून या जागेचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे?
दीक्षाभूमीच्या पवित्र आवारात व्यापारी तत्त्वावर बांधकामे उभारली जात असून राजकीय प्रभावाला खतपाणी घातले जात आहे. यामुळे निष्ठावंत अनुयायी या स्थळापासून दुरावला जात आहे.
अध्यक्ष अरुण गोटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत समाजाने विचारलेल्या रास्त प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी, सभाच बरखास्त करून टाकण्यात आली.
महामानवाच्या नावाने चालणाऱ्या संस्थेत जेव्हा एकाधिकारशाही, हुकूमशाही आणि पारदर्शकतेचा अभाव येतो, तेव्हा तो केवळ व्यवस्थापकीय दोष राहत नाही, तर तो वैचारिक द्रोह ठरतो.
गेल्या वर्षभरापासून चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यांत युवकांनी पेटवलेली स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृतीची मशाल आता 'जन आक्रोश' आंदोलनात रूपांतरित झाली आहे. १७ ऑगस्ट २०२६ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनात शेकडो अनुयायी एकत्र आले आणि त्यांनी ठरवले - आता बस झाले! आता दीक्षाभूमीच्या मुक्तीशिवाय माघार नाही.
१९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका दाखवली असली, तरी मेमोरियल सोसायटीच्या निष्क्रीय पदाधिकाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा प्रश्न कायमचा सुटणार नाही, हा समाजाचा ठाम निर्धार आहे.
येत्या १६ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूरच्या भूमीत आंबेडकरी अस्मितेचा महासागर उसळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यापासून निघणारा हा 'जन आक्रोश मोर्चा' जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
आंदोलनाचा मुख्य अजेंडा आणि मागण्या :
१) कार्यकारिणीचा राजीनामा : ३६ वर्षे अकार्यक्षम राहिलेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा देऊन व्यवस्थापन समाजाच्या स्वाधीन करावे.
२) नागपूरच्या धर्तीवर विकास : नागपूर दीक्षाभूमीप्रमाणे चंद्रपूरचा व्यापक विकास व्हावा आणि सर्व सामाजिक-धार्मिक संघटनांना समितीत प्रतिनिधित्व मिळावे.
३) व्यापारी बांधकामास बंदी : दीक्षाभूमीच्या जागेवर सुरू असलेले सर्व व्यापारी स्वरूपाचे बांधकामे तात्काळ थांबवण्यात यावीत.
४) प्रशासकीय हस्तक्षेप : जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करून या हुकूमशाही कारभाराला आळा घालावा आणि निष्पक्ष व्यवस्थापन नियुक्त करावे.
५) राजकीय हस्तक्षेपमुक्त सोहळा : १५ आणि १६ ऑक्टोबरच्या मुख्य धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात कोणत्याही राजकीय पक्षाचा थेट हस्तक्षेप किंवा प्रभाव नसावा.
हे आंदोलन केवळ एका कार्यकारिणीविरुद्धचे आंदोलन नाही; ही महामानवाच्या विचारांशी आणि त्यांच्या वारशाशी बांधिलकी जपण्याची लढाई आहे. ही लढाई आहे घराणेशाहीविरुद्ध, अकार्यक्षमतेविरुद्ध आणि दीक्षाभूमीचे व्यापारीकरण करू पाहणाऱ्या मानसिकतेविरुद्ध!
१६ सप्टेंबरचा हा दिवस केवळ एका मोर्च्याची तारीख उरणार नाही, तर तो चंद्रपूरच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाला नवी दिशा देणारा एक वैचारिक मैलाचा दगड ठरेल. महामानवाच्या विचारांचा वारसा हा कोण्या एका कुटुंबाची वा संस्थेची खाजगी जहागीर असू शकत नाही; तो संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा आणि संघर्षाचा जिवंत दस्तऐवज आहे. ही लढाई केवळ व्यवस्थापनाच्या बदलाची नसून, दीक्षाभूमीचे पावित्र्य, तिचे विचारनिष्ठ अधिष्ठान आणि आंबेडकरी चळवळीची नैतिक मूल्ये पुनरुज्जीवित करण्याची ऐतिहासिक जबाबदारी आहे. काळाच्या या निर्णायक वळणावर, विचारांशी निष्ठा बाळगणाऱ्या प्रत्येक पाईकाने, सुजाण तरुणाने आणि संपूर्ण समाजाने स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेवून संघटित ताकदीने मैदानात उतरणे गरजेचे आहे. आपला हा तीव्र जनआक्रोश म्हणजे अकार्यक्षमतेच्या विरोधात उठवलेला एक प्रगल्भ हुंकार आहे, जो सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेला लोकशाहीच्या मूलतत्त्वांची, समाजाच्या आत्मभानाची आणि आंबेडकरी विचारांच्या असीम ताकदीची प्रखर जाणीव करून देईल.
लेखक : © अनिल केशवराव बारसागडे
गडचिरोली- ४४२६०५ (महाराष्ट्र)
दिनांक : ०७/०९/२०२६
📲 ९४२०५१०२३९
📩 anil.barsagade@gmail.com

