धारदार शस्त्राने डोक्यात वार करून एका इसमाचा केला खून

0
धारदार शस्त्राने डोक्यात वार करून एका इसमाचा केला खून 


चामोर्शी :-
चामोर्शी ते मुल मार्गावरील वाघोली शिवारात एका अनोळखी इसमाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा वाघोली शिवारात चामोर्शी-मुल रोडपासून सुमारे १०० मीटर अंतरावर दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. या इसमाच्या डोक्यात काहीतरी तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मृत इसमाची उंची अंदाजे साडेपाच फूट असून रंग गोरा व शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याच्या अंगावर काळ्या रंगाचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट होती. तसेच गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ आणि पायात पॅरागॉन कंपनीच्या प्लास्टिक चप्पल आढळून आल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, खुनाचा तपास सुरू केला आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरावर तपास केला जात आहे. खुनामागील कारण तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

वरील वर्णनाशी मिळता-जुळता इसम आपल्या परिसरातून बेपत्ता असल्यास किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ चामोर्शी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे आणि खुनाचा छडा लावण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !