कुरखेडा पंचायत प्रशासनात खळबळ? भ्रष्टाचाराविरोधात FIR करणाऱ्या ABDO विरोधात माजी सरपंचांचे उपोषण; आजाद समाज पार्टी मात्र ABDO च्या समर्थनात

0
BIG
Breaking 

कुरखेडा पंचायत प्रशासनात खळबळ?

भ्रष्टाचाराविरोधात FIR करणाऱ्या ABDO विरोधात माजी सरपंचांचे उपोषण; आजाद समाज पार्टी मात्र ABDO च्या समर्थनात


उपोषण मागे न घेतल्यास शेकडो नागरिकांना घेऊन भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

कुरखेडा : पंचायत प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत दबंग कारवाई करणारे कुरखेडा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सावलखेडा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक व सरपंचांविरोधात FIR दाखल केल्याने सरपंच संघटना आक्रमक झाली असून, उराडे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने थेट ABDO देवांश उराडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरत प्रशासनाला इशारा दिला आहे.

ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याऐवजी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, अशी भूमिका आजाद समाज पार्टीने घेतली आहे.

*‘भ्रष्टाचारावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य का?’*

सावलखेडा येथील प्रकरणात ग्रामसेवक व सरपंचांविरोधात FIR दाखल झाल्यानंतर काही सरपंचांनी उराडे यांच्या निलंबनाची मागणी करत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे पंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.

“जर अधिकारी भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत असेल, तर त्याच्यावर निलंबनाची मागणी करून दबाव आणण्याऐवजी संबंधित ग्रामपंचायतीतील कारभाराची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

उराडे यांच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील पंचायत प्रशासनात एक वेगळाच संदेश गेला असून, या कारवाईने अनेक पंचायत कर्मचाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील गैरप्रकारांविरोधात अधिकारी कारवाई करणार की राजकीय दबावापुढे झुकणार? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

*सर्व संबंधित ग्रामपंचायतींची चौकशी करा!*

या प्रकरणाची माहिती मिळताच आजाद समाज पार्टीने तातडीने भूमिका घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. सीईओ दौऱ्यावर असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

यावेळी पक्षाने स्पष्ट मागणी केली की, ABDO देवांश उराडे यांच्यावर दबाव आणण्याऐवजी उपोषण करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. ग्रामपंचायतीमध्ये काही गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार झाला नसेल तर चौकशीत ते स्पष्ट होईल; मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्य करणे योग्य नाही.

कुरखेडा परिसरातील काही ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनीही उराडे यांच्या भूमिकेला समर्थन दर्शवत निवेदनावेळी उपस्थिती नोंदवली.

*‘राजकीय दबावापुढे प्रशासन झुकणार नाही’*

आजाद समाज पार्टीचे जिल्हाप्रभारी विनोद मडावी यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना म्हटले,

“भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी जर राजकीय दबाव आणला जात असेल, तर हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. राजकीय लोकच जर भ्रष्टाचाराला दुजोरा देणार असतील, तर जिल्ह्याच्या विकासाला यापेक्षा मोठा अडथळा कोणता असू शकतो? ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचे अड्डे बनू नयेत, यासाठी आजाद समाज पार्टी जनतेच्या बाजूने ठामपणे लढणार आहे.”

तसेच, “उपोषण मागे घेतले नाही आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला, तर शेकडो नागरिकांना सोबत घेऊन भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.

*आता प्रश्न ABDO यांच्या निलंबनाचा नाही, तर ग्रामपंचायतीतील कारभाराच्या चौकशीचा!*

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्यवाही करावी आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. जर अशा अधिकाऱ्यांच्या मागे उभे न राहिल्यास भविष्यात भ्रष्टाचार करणाऱ्याची हिम्मत अधिक वाढेल व ते देशविघातक बाब आहे. 

या संपूर्ण प्रकरणामुळे कुरखेडा पंचायत प्रशासनातील राजकीय समीकरणे आणि ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता सावलखेडा प्रकरणाची तसेच आवश्यकतेनुसार संबंधित ग्रामपंचायतींची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

निवेदन देताना आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, सचिव सुरेंद्र वासनिक, वडसा तालुका युवा अध्यक्ष मंगेश बन्सोड, गडचिरोली तालुकाध्यक्ष नितेश वेस्कडे यांच्यासह कुरखेडा परिसरातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !