आसरअल्ली वनपरिक्षेत्रात सागवान साठा जप्त, आठवडाभरात दुसरी कारवाई
२.५६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
आसरअल्ली :- वन परिक्षेत्रातून सागवान लाकडाची अवैध वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. आठवडाभरात करण्यात आलेल्या दुसऱ्या मोठ्या कारवाईत कोपेला नियतक्षेत्रातून तब्बल ३६ नग सागवान लाकूड जप्त करण्यात आले. जप्त केलेला लाकूड एकूण २.१८ घनमीटर असून त्याची अंदाजे किंमत २ लाख ५६ हजार ६२३ रुपये आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने कोपेला-नियतक्षेत्र परिसरात अचानक धाड टाकली. यावेळी तस्करांनी लपवून ठेवलेला सागवान लाकडाचा साठा आढळून आला. पथकाने तत्काळ सर्व ३६ नग सागवान लाकूड ताब्यात घेत वन परिक्षेत्र कार्यालयात जमा केले. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ अंतर्गत वन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी पानगे यांनी दिली. ही कारवाई सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी पानगे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आठवडाभरात सलग दुसरी मोठी कारवाई झाल्याने परिसरातील अवैध सागवान तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. अनधिकृत वृक्षतोड व लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे

