शोधार्थ गेला जंगलात वरंबीच्या, मात्र पडला वाघाच्या जबड्यात

0
शोधार्थ गेला जंगलात वरंबीच्या, मात्र पडला वाघाच्या जबड्यात 
 

वसा परिसरात सलग दुसरी घटना; वनविभागाकडून पंचनामा, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील वसा (पोर्ला) परिसरात वरंबी गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह गुरुवारी (ता. २४) आढळून आला. बाळू विठ्ठल राऊत (रा. वसा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, वन्यप्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी वाघाच्या पंजाचे ठसे आढळल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.

बाळू राऊत हे बुधवारी (ता. २३) सकाळी आठच्या सुमारास रानभाज्या गोळा करण्यासाठी पोर्ला वनपरिक्षेत्रातील जंगलात गेले होते. मात्र, रात्रीपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय व ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी पाचभाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी आणि ग्रामस्थांनी रात्रीपासूनच जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली.

शोधमोहीमेदरम्यान गुरुवारी सकाळी जंगल परिसरात राऊत यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या परिसरात वन्यप्राण्याच्या हालचालींचे चिन्ह तसेच वाघाच्या पंजासदृश ठसे आढळल्याचे सांगण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, आरमोरी येथे पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोर्ला परिसरात यापूर्वीही वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे जंगलात जाणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

वसा व पोर्ला परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच मृत शेतकरी बाळू राऊत यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !