दत्तक प्रक्रियेत चार अनाथ बालकांना मिळाले नाथ, कायदेशीर पालकत्व

0
दत्तक प्रक्रियेत चार अनाथ बालकांना मिळाले नाथ, कायदेशीर पालकत्व

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशान्वये चार प्रकरणे मंजूर


गडचिरोली, दि. २१ सप्टेंबर (जिमाका) : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व सुधारित अधिनियम, २०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या आदेशान्वये चार बालकांच्या नाते अंतर्गत दत्तक प्रक्रियेला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचना तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्र. १०८५/२०२३ मधील दि. ४ मे २०२६ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाच्या कलम ५६ (२) तसेच दत्तक नियमनावली, २०२२ मधील तरतुदींनुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे प्राप्त प्रकरणांची आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर पडताळणी करण्यात आली.

या प्रक्रियेत संबंधित प्रकरणांतील आवश्यक दस्तऐवज, कायदेशीर कागदपत्रे आणि दत्तक प्रक्रियेसाठी निर्धारित अटी व निकषांची सविस्तर छाननी करण्यात आली. आवश्यक निकषांची पूर्तता करणाऱ्या चार प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तक आदेश जारी करण्यात आले.

या आदेशामुळे संबंधित बालकांच्या दत्तक संबंधांना कायदेशीर मान्यता प्राप्त झाली असून, त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे कायदेशीर पालकत्व मिळाले आहे. यामुळे बालकांना स्थिर व सुरक्षित कौटुंबिक वातावरणात संगोपन मिळण्यासोबतच त्यांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने दत्तक संबंधांना कायदेशीर आधार प्राप्त झाला आहे.

ही कार्यवाही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणांची आवश्यक पडताळणी व प्रशासकीय कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले आणि बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसूटकर यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !