बेडगाव पोलीसांची अवैद्य जुगारावर धाड, ३१ आरोपींना रंगेहाथ केली अटक
1,34,14,010/- रुपयांच्या मूद्देमाल जप्त
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील अवैध व्यवसाय व जुगार इत्यादींवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस मदत केंद्र बेडगाव येथील पोलीस पथकाकडून अवैध जुगार खेळणाऱ्या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 18/09/2026 रोजी रात्री पोमकें बेडगाव हद्दीतील आंतरराज्य सिमेलगत असलेल्या मौजा गहाणेगाळा जंगल परिसरात काही इसम बेकायदेशिररित्या ताश पत्त्यांच्या सहाय्याने अवैद्यपणे पेैसे लाऊन हार जितचा खेळ करीत आहेत. अशी गोपनिय माहिती पोलीस मदत केंद्र बेडगाव येथील पोलीस पथकास मिळाली होती. सदर माहीतीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें बेडगाव येथील पोउपनि. दिनेश खोटेले व पोलीस पथक असे मौजा गहाणेगाठा येथे पोहचून दोन पंचांसह जंगल परीसरात घटनास्थळी धाड टाकली असता, काही इसम हे बेकायदेशीररित्या 52 ताश पत्त्यांच्या सहाय्याने पैशाची बाजी लाऊन जुगाराचा खेळ करताना दिसून आले. पोलीसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले. यावेळी पोमकें बेडगाव येथील पोलीस पथक यांनी प्रभावीपणे कारवाई करत घटनास्थळावर जुगार खेळणारे 1) शैलेंद्र कुमार साहू, वय 26 वर्षे, रा. बेलारगोंदी, ता. छुरीया, जि. राजनांदगाव (छ.ग.), 2) मोहम्मद बसिर, वय 48 वर्षे, रा. वार्ड नं. 12, राजनांदगाव, जि. राजनांदगाव यांच्यासह एकूण 29 आरोपी तसेच जुगार साहीत्य आणि रोख रक्कम ताब्यात घेतले आहेे. घटनास्थळावरील आरोपींना सदर जुगार कोणी भरविल्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी 1) छत्रपती बांगरे, रा. कोरची, 2) अमजतखॉ पठाण, 3) तालीब, रा. डोंगरगड, 4) राजा ब्राँड ऊफ राजा श्रिवास, रा. राजनांदगाव, 5) हेमंत राजपुत रा. राजनांदगाव यांच्या सांगण्यावरुन जुगार खेळण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच इतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाल्याचे सांगितले. यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या अंगझडती दरम्यान घटनास्थळावरुन 75,010/- रुपये रोख रक्कम तसेच 22 चार चाकी वाहने, 06 दुचाकी वाहने, 26 मोबाईल फोन, जुगार खेळण्याचे पत्ते, असा एकूण 1,34,14,010/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह एकूण 31 आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित घटनेच्या अनुषंगाने ताब्यात घेण्यात आलेल्या व घटनास्थळावरुन पळून गेलेल्या आरोपीतांसह एकूण 37 आरोपीतांविरुध्द पोस्टे कोरची येथे अप क्र. 0133/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पाहिजे असलेले आरोपी नामे 1) सोनु कांबळे, रा. दुर्ग, 2) इम्रान शेख, रा. डोंगरगाव, 3) बबलु खाटीक, रा. भिलाई, 4) रोहीत शाहु, रा. राजनांदगाव, 5) बसंत सोनी, रा. दुर्ग व 6) अबुल वर्मा रा. राजनांदगाव यांचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. दिनेश खोटेले, पोलीस मदत केंद्र बेडगाव हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान). कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा. प्रमोद मडामे तसेच पोस्टे कोरचीचे पोनि. दिपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें बेडगावचे पोउपनि. दिनेश खोटेले, पोअं/विकास शेंडे, अनिल मडावी, सचिन येलमुलवार, मिथुन रासेकर, उमेशकुमार बन्सोड यांनी केलेली आहे.

