स्मशानभूमीचा रस्ता कागदावरच , अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्याचा प्रवास खडतर
प्रतिनिधी :- प्रमोद झरकर
येणापूर:-
चामोर्शी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायत हद्दीतील किष्टापूर टोला गावातील नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. गावात जिवंतपणी सुरक्षित प्रवासासाठी रस्ता उपलब्ध नाही आणि एखादा नागरिकाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याचा मार्ग सुद्धा नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. खांद्यावर शव घेत अंत्ययात्रा काढल्यानंतर रस्ता कुठून पार करायचा हे वास्तव पाहायला मिळत आहे.
किष्टापूर टोला गावासाठी शासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. परंतु स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता नेमका गेला कुठे, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाकडून जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरही स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शासन प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका होतांना दिसते आहे
किष्टापूर टोला गावातील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे.पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. अशा वेळी मृतदेह नेताना खूपच अडचणी निर्माण होतात. यामुळे ग्रामस्थांकडून सुरक्षित रस्त्याची मागणी केली जात आहे.
स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पक्का आणि सुरक्षित रस्ता तयार करावा.शासनाचा निधी उपलब्ध असतानाही नागरिकांना अशा प्रकारे हालअपेष्टा सहन कराव्या लागत असतील तर ग्रामपंचायत समितीने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी. अशी मागणी युवा कमेटी कोषाध्यक्ष प्रशांत प्रकाश गावडे आणि ग्रामस्थानी केली.

