ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे महत्त्वाचे आधारस्तंभ- रोहिदास राऊत
गडचिरोली – ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. ते तरुण पिढीला पुढे जाण्यासाठी दिशा देत असतात. देशाच्या प्रगतीत आणि उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचा सन्मान व प्रतिष्ठा जपली पाहिजे आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक श्री. रोहिदास राऊत यांनी केले.
सोमवारी येथे गोकुळ नगरमध्ये 'सम्यक ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थे' तर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिकांचा मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे होते, तर संस्थापक अध्यक्ष कवडूजी उंदीरवाडे आणि प्रसिद्ध दंतचिकित्सक व समाजसेविका डॉ. अंकिता धाकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. राऊत पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आयुष्यात मिळवलेला समृद्ध अनुभव आणि ज्ञान राष्ट्र उभारणीच्या कार्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली धर्मनिरपेक्ष रचना टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी आपला आवाज बुलंद केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. धाकडे म्हणाल्या की, वृद्ध व्यक्ती या समाजाचा कणा आहेत. त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टींविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे. कवडूजी उंदीरवाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना समाजाचा नैतिक आधार मानले आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात श्री. हंसराज उंदीरवाडे म्हणाले की, संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी सतत कार्य करत राहील.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा. गौतम डांगे, बाळकृष्ण बांबोडे, आर. डी. मेश्राम यांनीही आपले विचार मांडले.
संस्थेचे सचिव श्री. प्रदीप भैसार यांनी वार्षिक अहवाल सादर केला, तर श्री. लहूकुमार रामटेके यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व संस्थेचे उपाध्यक्ष आत्माराम भानारकर यांनी आभार मानले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

