तेंदूपत्ता बोनसावरून ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा

0

तेंदूपत्ता बोनसावरून ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा दिला इशारा


बोनसातून घरपट्टी-पाणीपट्टी कपातीवर संताप; ग्रामसेवकांना धरले धारेवर 

चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा (कं) ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मौजा बामणपेठ येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत ग्रामसेवक मिसार यांना जाब विचारला. गेल्या वर्षीच्या तेंदूपत्ता हंगामाचा बोनस ग्रामपंचायतीकडे येऊन तीन महिने झाले असतानाही त्याचे वाटप करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यातच बोनसच्या रकमेतून घरपट्टी व पाणीपट्टी कपात करण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.

तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जीव धोक्यात घालून मेहनत करणाऱ्या ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या बोनसच्या रकमेतून घरपट्टी व पाणीपट्टी कपात का करण्यात आली, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. गावात दरवर्षी घरपट्टी व पाणीपट्टी वसुली केली जाते, मग त्या रकमेतून गावात कोणती विकासकामे करण्यात आली, याचा हिशेब दाखवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

“गावातील कामे दाखवा, मगच कर भरू” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून, बोनस रकमेतून कपात करण्यात आलेली रक्कम तातडीने परत करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, बामणपेठ हे गाव पेसा अंतर्गत येत असल्याने ग्राम कोष समितीच्या माध्यमातून जमा होणारा निधी सरपंचांच्या खात्यावर कसा जमा झाला? त्या खात्यावर किती रक्कम जमा आहे आणि गावाच्या विकासासाठी आतापर्यंत किती निधी खर्च करण्यात आला, याची संपूर्ण माहिती देण्यात यावी, अशी मागणी पेसा समितीचे अध्यक्ष साईनाथ कुळमेथे यांनी ग्रामसेवकांकडे केली. मात्र, ग्रामसेवकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

यावेळी ग्रामसेवक मिसार यांनी घरपट्टी व पाणीपट्टीची कपात केलेली रक्कम परत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनावर समाधान न मानता ग्रामस्थांनी दोन-तीन दिवसांत कपात केलेली रक्कम परत न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला.

‘आमचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांना बोलावले का?’

गावातील समस्या मांडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आलो असताना पोलिसांना का बोलावण्यात आले, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. पोलिसांचा दबाव आणून ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला का, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

ग्रामसेवक व सरपंच यांच्या माध्यमातून गावकऱ्यांकडून विविध करांची वसुली केली जाते; मात्र त्यातून गावाला आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

दरम्यान, ग्रामसेवक मिसार यांनी उपस्थित ग्रामस्थांना नवीन घरपट्टी व पाणीपट्टी लागू करण्यात आली असून ती कायम राहणार असल्याचे सांगितले. बोनसातून कपात केलेली रक्कम परत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ग्रामपंचायतीकडून मिळणारी प्रमाणपत्रे ग्रामपंचायतीचा कर भरल्याशिवाय मिळणार नाहीत, तसेच कर थकबाकी राहिल्यास ग्रामपंचायत प्रशासन आपल्या स्तरावरून वसुलीची कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी बामणपेठ येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ तसेच पोलीस उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि पेसा निधीच्या व्यवहाराचा तपशील समोर आल्यानंतर या प्रकरणाला अधिक स्पष्टता येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !