महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा
गडचिरोली :
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्या संदर्भात संघटनेच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री. आशिष वानखेडे यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी संघटनेने दिला आहे.
महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण, सुट्ट्यांच्या दिवशी कामाची सक्ती आणि रिक्त पदांमुळे उद्भवलेली परिस्थिती याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करताना संघटनेचे राज्य संघटक तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष वनिशाम येरमे, सरचिटणीस गौरीशंकर ढेंगे यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत :
• पाच दिवसांचा आठवडा व सुट्ट्यांचे पालन: शासकीय नियमांनुसार लागू असलेल्या ५ दिवसांच्या आठवड्याचे आणि सुट्ट्यांचे काटेकोर पालन व्हावे. सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू नये, तसेच व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून मानसिक त्रास देऊ नये.
• कार्यालयीन वेळेची मर्यादा : कार्यालयीन वेळ संपल्यानंतर किंवा हक्काच्या सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यालयात थांबण्याची सक्ती करण्यात येऊ नये.
• आरोग्य व कौटुंबिक स्थितीचा विचार : कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक आणि शारीरिक आरोग्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करूनच प्रशासकीय कामांचे योग्य नियोजन केले जावे.
• प्रभारी आदेशांवर बंदी : पुरवठा शाखेमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे प्रभारी आदेश करण्यात येऊ नयेत.
• नवीन पदांची निर्मिती : महसूल विभागातील व्यपगत (रद्द) करण्यात आलेल्या स्टेनो पदांच्या जागेवर सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांची नवीन पदे तातडीने निर्माण करण्यात यावीत.
• निवडणूक विभाग सक्षमीकरण : निवडणूक विभागातील रिक्त पदांची तात्काळ भरती करावी, नवीन पदे निर्माण करून नवीन आकृतीबंधास मंजुरी देण्यात यावी.
• ग्रेड पे मध्ये सुधारणा: नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवून तो रुपये ४,८००/- करण्यात यावा.
• कोतवाल भरती: गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त असलेली कोतवाल पदांची भरती प्रक्रिया त्वरित राबवण्यात यावी.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा :
निवेदन सादर करताना जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी स्पष्ट केले की, महसूल कर्मचारी नेहमीच प्रशासकीय कामात आपले योगदान देतात. परंतु, त्यांच्या हक्कांच्या सुट्ट्या नाकारणे आणि मानसिक त्रास देणे आता सहन केले जाणार नाही. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी कामबंद आंदोलनासह विविध मार्गांनी तीव्र लढा उभारतील, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून यावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे

