प्रसूतीनंतर मातेसह नवजात बाळाचा मृत्यू , गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; डॉक्टर प्रवीण किलनाके यांच्यासह डॉक्टर देवरे यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी
गडचिरोली : प्रसुतीनंतर नवजात बाळ व मातेचा मृत्यु झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे
चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २१ वर्षीय गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाच्या दुर्दैवी मृत्यूने जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रसूतीच्या वेळी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तसेच गडचिरोली येथे रेफर करण्याच्या प्रक्रियेत कथित विलंब झाल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात चामोर्शी सामान्य रुग्णालयातील डॉक्टर प्रवीण किलणाके यांच्यासह डॉक्टर देवरे यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जामगिरी येथील जिजा हंसराज सातर (वय २१) यांना दि .२३ ला रविवारी पहाटे सुमारे पाच वाजता प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. गर्भधारणेचा कालावधी पूर्ण झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास प्रसूतीकळा वाढल्या. काही वेळात प्रसूती होईल, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीयांच्या आरोपानुसार, बराच वेळ उलटूनही संबंधित डॉक्टरांकडून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू झाले नाहीत.
महिलेची प्रसूती होत नसल्याने आणि त्रास वाढत असल्याने तिची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला गडचिरोली येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. दरम्यान, रेफर लेटरवर स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित डॉक्टर उपलब्ध होण्यासही विलंब झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याने तिला चामोर्शी येथेच सिझेरियन करून प्रसूती करण्याची विनंती कुटुंबीयांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून गडचिरोली येथे हलविण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास महिलेला गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.
गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात पोहोचल्यानंतर तपासणी केली असता बाळाच्या हृदयाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर जिजा यांना तातडीने प्रसूती कक्षात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू झाला.
बाळाच्या मृत्यूनंतर महिलेची प्रकृतीही अधिकच गंभीर झाली. तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची स्थिती चिंताजनक बनली. डॉक्टरांच्या पथकाने तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सायंकाळी महिलेनेही प्राण सोडले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची स्थिती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या पथकाने उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चामोर्शी रुग्णालयात येथे वेळीच उपचार झाले असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती

