तिर्थक्षेत्र प्रशांतधाम हनुमान मंदिराच्या विकासासाठी निधी देण्याची यावा अशी निवेदनाद्वारे मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या चपराळा येथील प्रशांत धाम हनुमान मंदिराच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चपराळा हनुमान मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने केली आहे. यासंदर्भात विश्वस्त मंडळाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जिल्हा मुख्यालय पासून सुमारे ९२ किलोमीटर अंतरावर असलेले चपराळा हनुमान मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नद्यांच्या संगमावर निसर्गरम्य व जंगलव्याप्त परिसरात असलेल्या या देवस्थानात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे जिल्ह्यासह आंध्रप्रदेश या विविध भागांतून भाविकांची मोठी गर्दी येथे होत असते.
मात्र, देवस्थान परिसरात आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदिर व परिसराचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच इतर मूलभूत कामांसाठी शासनाकडून निधी मिळणे आवश्यक असल्याचे विश्वस्त मंडळाने निवेदनातून स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन
विश्वस्त मंडळाच्या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चपराळा देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय पंदिलवार, सचिव रामचंद्र बामणकर, अंजना दुर्गे, मनोहर बामणकर, दिपक माईरवार, प्रकाश गौडे, भास्कर हुलके, मधुकर धानोरकर, बालाजी चौधरी, सुधाकर बतुलवार, किसन गरपल्लीवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

