घंटागाड्या ग्रामपंचायत आवारात धूळखात; स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या प्रशासनावरच ग्रामस्थांचा सवाल!
आष्टी (प्रतिनिधी): शासनाकडून गावागावांत स्वच्छता अभियान राबवून ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याचे आणि गाव स्वच्छ राखण्याचे आवाहन केले जात असताना, चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं.) ग्रामपंचायतीच्या आवारात कचरा संकलनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या घंटागाड्या मात्र धूळखात पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचा स्वच्छतेचा उद्देश नेमका साध्य कसा होणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
गावातील घराघरातून ओला व सुका कचरा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या गाड्यांचा नियमित वापर करण्याऐवजी त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उभ्या असल्याने शासनाचा खर्च वाया जात असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कचऱ्याचे विलगीकरण व व्यवस्थापन करण्यासाठी कचरा विलगीकरण शेड उभारण्यात आले आहे. मात्र घंटागाड्यांचा वापरच होत नसेल तर या शेडचा उपयोग तरी काय? असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च, प्रत्यक्षात घंटागाड्या बंदच?
गावातील स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातून घंटागाड्या, कचरा विलगीकरण शेड आणि इतर सुविधा उभारल्या जातात. मात्र या सुविधा प्रत्यक्ष वापरात नसतील तर शासनाच्या निधीचा अपेक्षित परिणाम कसा साध्य होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
घंटागाड्या नियमितपणे गावातील प्रत्येक वॉर्डात फिरवून घराघरातून ओला व सुका कचरा संकलित करावा, तसेच संकलित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
‘गाड्या धूळखात ठेवण्यासाठी दिल्या आहेत का?’
ग्रामपंचायत आवारात घंटागाड्या उभ्या ठेवून त्यांचा वापर न केल्यास त्या खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने स्वच्छतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’चा संदेश देणारे प्रशासन घंटागाड्या धूळखात ठेवून नेमके काय साध्य करणार? असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने घंटागाड्या कार्यान्वित करून नियमित कचरा संकलन सुरू करावे, कचरा विलगीकरण शेडचा प्रभावी वापर करावा आणि गावातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

