पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीसमोरच घाणीचे साम्राज्य; तुंबलेल्या नालीने प्रशासनाच्या स्वच्छतेचा दावा पडला उघडा

0

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीसमोरच घाणीचे साम्राज्य; तुंबलेल्या नालीने प्रशासनाच्या स्वच्छतेचा दावा पडला उघडा

मुख्य गेटसमोरील नाली पाण्याने तुडुंब; गावातील स्वच्छतेबाबत ग्रामस्थांकडून सवाल


चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा (कं) ग्रामपंचायतीला आजवर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र, याच ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यालयाच्या गेटसमोरच नाली पाण्याने तुडुंब भरून तशीच पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या कारभाराचे प्रमुख केंद्र मानले जाते. गावातील स्वच्छता, नाल्यांची साफसफाई आणि सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर असते. मात्र, स्वतःच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील नालीच पाण्याने भरलेल्या अवस्थेत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुख्य गेटसमोरील नालीमध्ये पाणी साचल्याने दुर्गंधी निर्माण होण्यासह डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात नालीतील पाणी ओसंडून परिसरात पसरण्याचीही शक्यता असून, ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कार्यालयासमोरील नालीची ही अवस्था तर गावातील नाल्यांचे काय?

ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळाले असताना कार्यालयाच्या अगदी मुख्य गेटसमोरील नालीची नियमित साफसफाई होत नसेल, तर गावातील अंतर्गत भागातील नाल्यांची परिस्थिती काय असेल, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

“ग्रामपंचायत प्रशासनाला आपल्या कार्यालयासमोरील नाली स्वच्छ ठेवता येत नसेल, तर गावातील सर्व नाल्यांची नियमित स्वच्छता केली जाते का?” असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब असली तरी त्या पुरस्कारांचा खरा अर्थ गावातील स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांमध्ये दिसून यायला हवा. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील नालीची अवस्था मात्र या व्यवस्थेवर वेगळेच चित्र दाखवत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष की स्वच्छतेकडे कानाडोळा?

गावातील नाल्यांची नियमित साफसफाई, साचलेला गाळ व कचरा काढणे आणि पाण्याचा निचरा सुरळीत ठेवणे आवश्यक असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

ग्रामपंचायत कार्यालयासमोरील नाली तातडीने उपसा करून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच गावातील सर्व नाल्यांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी साफसफाईची मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

आता पुरस्कारांनी गौरविलेल्या मार्कंडा (कं) ग्रामपंचायतीचे प्रशासन या तुंबलेल्या नालीकडे कधी लक्ष देते आणि गावातील स्वच्छतेबाबत ठोस उपाययोजना करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !