सोनापूर नाल्याच्या पुरात गेल्या तीन दुचाकी वाहून, दुचाकीस्वार बचावले सुखरूप
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. चामोर्शी-आष्टी मार्गावरील सोनापूर पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा धोकादायक परिस्थितीत पुल ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन दुचाकी आणि एक सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पुराच्या प्रचंड वेगामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूर आलेल्या पुलांवरून किंवा रस्त्यांवरून वाहन नेण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, तसेच प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाले अजूनही धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

