रेंगेवाही नाल्याच्या पुरात वाहून गेली क्रेटा, दोघांना वाचवण्यात शासनास आले यश

0

रेंगेवाही नाल्याच्या पुरात वाहून गेली क्रेटा, दोघांना वाचवण्यात शासनास आले यश 


मृत्यूच्या दाढेतून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला खेचून आणले; सुरक्षित बाहेर पडताच पुराच्या रौद्र लाटांनी क्रेटा गिळंकृत!

महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि आष्टी पोलिसांची जीवावर उदार थरारक मोहीम; क्षणभर उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना अटळ

आष्टी (अशोक खंडारे):- आष्टी ते मुलचेरा मार्गावर रेंगेवाही जवळ असलेल्या नाल्याच्या पुरात एक क्रेटा कार वाहून गेली मात्र शासनाच्या तत्परतेने दोघाचे जीव वाचले अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे 
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः ठप्प केले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाकडून वारंवार इशारे दिले जात असतानाच मुलचेरा तालुक्यात गुरुवारी मृत्यूशी दोन हात करणारी थरारक घटना घडली. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पेडीगुडमचे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद अझरुद्दीन यांना महसूल विभाग, तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आष्टी पोलिसांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून खेचून सुरक्षित बाहेर काढले. मात्र, अधिकारी सुरक्षित होताच त्यांच्या क्रेटा कारला पुराच्या रौद्र प्रवाहाने क्षणार्धात गिळंकृत केले.

तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अझरुद्दीन हे आष्टीहून मुलचेराकडे आपल्या क्रेटा वाहनाने निघाले होते. रेंगेवाहीजवळील नाल्यावर पोहोचताच अचानक पाण्याचा वेग भीषण झाला. क्षणात वाहनाचा तोल गेला आणि ते पुलाच्या कडेला अडकले. आणखी काही फूट पुढे सरकले असते, तर वाहनासह अधिकारी पुराच्या तुफानी प्रवाहात वाहून गेले असते.

संकटाची चाहूल लागताच मोहम्मद अझरुद्दीन यांनी तत्काळ तहसीलदार चेतन पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र, बचावासाठी निघालेल्या तहसीलदारांनाही कोपरअली येथील दिना नदीच्या पुरामुळे मार्ग बदलावा लागला. घोट–मार्कंडा मार्गे रेंगेवाही येथे पोहोचताच बचाव मोहिमेला वेग देण्यात आला.

त्यानंतर मुलचेरा तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आष्टी पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुराच्या प्रचंड प्रवाहात थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मोहम्मद अझरुद्दीन यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, नियतीचा थरार इथेच संपला नाही. अधिकारी सुरक्षित बाहेर पडताच काही क्षणांतच त्यांची क्रेटा कार पुराच्या वेगवान लाटांमध्ये वाहून गेली. हा संपूर्ण प्रसंग पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले.

महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि आष्टी पोलिसांच्या वेळेवर केलेल्या धाडसी कारवाईमुळे एक अमूल्य जीव वाचला. बचाव मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोहम्मद अझरुद्दीन यांनी मनःपूर्वक आभार मानले.

दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा कहर कायम असून अनेक रस्ते, पूल आणि नाले धोकादायक बनले आहेत. जीव धोक्यात घालून पूरग्रस्त रस्ते किंवा नाले ओलांडू नयेत, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !