आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सिग्नल तर सुरूझाले तरीही दबदबा मात्र लॉयड्स मेटलच्या सुरक्षा रक्षकांचा?
आष्टीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अपघाताचा वाढला धोका
लाईंड मेटल कंपनीच्या सुरक्षा रक्षकांकडून वाहतूक नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; पोलिसांसारखे अधिकार नसताना लाॅयड्स मेटल ॲन्ड एनर्जी लिमिटेडच्या वाहनांना मार्ग मोकळा
आष्टी (अशोक खंडारे) : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने दररोज वर्दळ असते आता नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झाली असल्याने आंबेडकर चौकात वाहनांची फार मोठी गर्दी होते आहे
आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नुकतेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या चौकात वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीत वाहतूक नियंत्रणासाठी तैनात करण्यात आलेले लॉयड्स मेटल कंपनीचे सुरक्षा रक्षक (Security Guards) वाहतूक नियमांचे पालन न करता स्वतःच्या हातवाऱ्याने सुरजागड येथून येणारे व जाणारे वाहने सोडत असल्याने गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, सिग्नल सुरू असतानाही सुरक्षा रक्षक हात दाखवून वाहने पुढे सोडतात. एवढेच नव्हे तर काहीवेळा सिग्नल बंद असतानाही ते स्वतःच्या अंदाजाने वाहतूक सुरू ठेवतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून चौकात कधीही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वाहतूक नियंत्रणाचे काम हे प्रशिक्षित वाहतूक पोलिसांचे असते. मात्र, संबंधित सुरक्षा रक्षकांना वाहतूक नियमनाचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचा आरोप वाहनचालकांकडून केला जात आहे. परिणामी, सिग्नल यंत्रणा सुरू असताना नियमांऐवजी हातवाऱ्यावर वाहतूक सुरू असल्याने संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत
नागरिकांनी प्रशासन आणि पोलीस विभागाकडे मागणी केली आहे की, सिग्नल पूर्णपणे सुरळीत व नियमानुसार कार्यरत होईपर्यंत सुरक्षा रक्षकांनी पोलिसांप्रमाणे हात दाखवून वाहने सोडू नयेत. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी केवळ प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांकडेच द्यावी किंवा सुरक्षा रक्षकांना आवश्यक प्रशिक्षण दिल्यानंतरच त्यांच्याकडून हे काम करून घ्यावे असे वाहनचालकांचे म्हणणे आहे की, चौकात वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा निष्काळजीपणामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आष्टीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नियमबाह्य पद्धती थांबवावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

