वैनगंगा पुलावर पुन्हा तडे; निकृष्ट कामाचा पर्दाफाश?
दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या खड्ड्यानंतर नवा धक्का; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी पुलावर भला मोठा खड्डा पडून झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक चालकाला आपला पाय गमवावा लागला होता. त्या घटनेची चर्चा थांबत नाही तोच आता त्याच खड्ड्यालगत पुलावर तडे गेल्याचे समोर आले असून, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, या पुलाचे बांधकाम अवघ्या वर्षभरापूर्वी पूर्ण झाले असून, सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात आला आहे. एवढा मोठा निधी खर्च करूनही इतक्या कमी कालावधीत पुलावर खड्डे आणि तडे दिसून येत असल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालकाला कायमचे अपंगत्व आले. त्यानंतरही संबंधित यंत्रणांनी केवळ तात्पुरती दुरुस्ती करून जबाबदारी झटकली. आता पुन्हा पुलावर तडे दिसून आल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून पुलाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, "हे तडे केवळ पुलाला गेलेले नाहीत, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवरील विश्वासालाच गेलेले तडे आहेत." त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत तातडीने स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

