शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा - खा. डॉ. नामदेव किरसान

0
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणेने पुढाकार घ्यावा - खा. डॉ. नामदेव किरसान


‘दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्न; विकासकामांना गती देण्याचे निर्देश

गडचिरोली :-

जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि सक्रिय भूमिका घ्यावी, अशा स्पष्ट सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (‘दिशा’) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.

खासदार डॉ. किरसान यांनी केंद्र पुरस्कृत आणि जिल्हास्तरावर सुरू असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला विकासकामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

*ग्रामीण रस्ते, आरोग्य व शिक्षणावर भर*
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते विकास आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. पोषण आहार वितरणाबाबत बोलताना खासदार किरसान यांनी अनेक ठिकाणी धान्याची खरेदी अगोदर होऊन त्याचे वितरण उशिरा होत असल्याने गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

*स्वच्छता आणि घरकुल योजनांबाबत सूचना*
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत घंटागाडीमार्फत घराघरातून कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध असतानाही काही भागांत कचरा साचत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांकडून घरातूनच कचरा संकलन सुनिश्चित करण्यासाठी नगरपरिषदांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील काही लाभार्थ्यांना हप्ते मिळाले असले तरी इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली व तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. आष्टी ते आलापल्ली या ४५ कि.मी. रस्त्यापैकी आष्टी ते लगाम या १७ कि.मी. काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित लगाम ते आलापल्ली काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आलापल्ली ते सिरोंचा मार्गाच्या कामातील दिरंगाईबाबत खासदार किरसान यांनी नाराजी व्यक्त करत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागातील खडीकरण रस्त्यांसाठी प्रमाणित निकष निश्चित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

लोकप्रतिनिधींमार्फत मांडण्यात येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि आमदार रामदास मसराम यांनी आपल्या मतदारसंघातील विविध समस्या मांडून त्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

बैठकीला जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !