आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रवाशांसाठी केली खास पाणपोई सुरू
ग्रामीण पत्रकार संघटनेचा स्तुत्य उपक्रम
आष्टी (अशोक खंडारे), दि. १ मे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रवासी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामीण पत्रकार संघ, आष्टी (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्या वतीने बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रवासी निवारा येथे खास पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवासी, नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आष्टी शहरात दरवर्षी १४ एप्रिलपासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने याच ठिकाणी पाणपोई सुरू केली जात होती. मात्र, यावर्षी उन्हाळ्याचा कडाका वाढूनही ग्रामपंचायतीला या सेवांचा विसर पडल्याचे चित्र दिसून आले. परिणामी प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीतून पाणपोई सुरू करून प्रशासनालाच आरसा दाखविला आहे.
उन्हाळ्याच्या कडाक्यात अनेक प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भासते. ही गरज ओळखून संघाने शीतल पेयजलाची व्यवस्था केली असून या सेवेमुळे बसस्थानक परिसरात थांबणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पाणपोईचे उद्घाटन आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर कुंदोजवार, नितीश पोद्दार, पराग गोनपल्लीवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल आलूरवार आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक रॉय, उपाध्यक्ष अशोक खंडारे, सचिव सुधीर फरकाडे, कोषाध्यक्ष गणेश शिंगाडे, सदस्य संजय भोयर, भास्कर फरकडे, संदीप जोरगलवार यांच्यासह पदाधिकारी व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
“मानवतेची सेवा हीच खरी समाजसेवा” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शीतल पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त करत ग्रामीण पत्रकार संघाचे आभार मानले.

