हैदराबाद (तेलंगाना राज्य) येथे मराठी कवी प्रभाकर दुर्गे यांना राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार
आष्टी :- विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा व अखिल महाराष्ट्र पत्रकार, पत्रलेखक संघ (रजि. ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमानाने हैदराबाद तेलंगणा राज्यात नुकतेच पार पडलेल्या राष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलनात गडचिरोली जिल्हा अंतर्गत मुलचेरा तालुक्यात येणाऱ्या अडपल्ली चक या खेडे गावचे युवा विद्रोही कवी प्रभाकर देविदास दुर्गे (छायासुत) यांना राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार २०२५ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात विविध राज्यातून आपापल्या मातृभाषेचा गौरव करण्याकरीता संपूर्ण देशभरातील साहित्यिकांची उपस्थिती होती. त्यात प्रभाकर देविदास दुर्गे (छायासुत) यांचा देखील सहभाग होता. त्यांनी शेतकऱ्याची दिवाळी ही जिवंत कविता सादर करत संपूर्ण देशभरातील आलेल्या साहित्यिक, रसिकांची मने जिंकत माय मराठीचा झेंडा रोवला.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून मा. प्रा. डॉ. विद्या देवधर (सुप्रसिद्ध लेखिका हैदराबाद), मा. डॉ. जयलक्ष्मी सानिपिना (इंटरनॅशनल आयकॉन), मा. सदानंद येलगंटी (सुप्रसिद्ध साहित्यिक कर्नाटका), मा. ज्योती पांका (आंतरराष्ट्रीय स्कूल, कॉलेज संस्थापिका, सुप्रसिद्ध कवयित्री अरुणाचल प्रदेश), मा. प्रफुल केवट (सुप्रसिद्ध साहित्यिक आसाम) मा. अध्यक्षीय मंडळ प्रमुख हेमलता गीते, व या संस्थेचे सर्वेसर्वा शिवराज पाटील हे उपस्थित होते.
त्यांच्या या सन्मानाबद्दल परिवार, सहकारी मित्र/मैत्रिणी, गाववासीय तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

