लिफ्टवरुण खाणीत पडून एका कामगाराचा दुर्दैवी अंत
बल्हारपूर :-
शहरातील बल्लारपूर कॉलरीच्या भूमिगत खाणीत १ ऑक्टोबर रोजी एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. माहिती नुसार, रात्रीची पाळी सुरू असताना सुमारे ११ वाजता हेमराज उर्फ नितिन भाऊराव ढवस (वय ३५) लिफ्टवर चढताना पाय घसरण्यामुळे ५०० फूट खाली पडले. या अपघातात त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
हेमराज ढवस मागील ९ वर्षांपासून या खाणीमध्ये पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. अपघात इतका गंभीर होता की, त्याचे शरीर गंभीर जखमी झाले आणि मृतदेह पाहणे अत्यंत कठीण झाले आहे. मृत्यूच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कामगारांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिली.
स्थानिक सूत्रांनी सांगितले की, मृतकाने आयपीएलमध्ये सट्टा लावून मोठे आर्थिक नुकसान सहन केले होते. त्यासाठी तो अवैध सावकारांकडून कर्ज घेत होता. काही अधिकाऱ्यांच्या मते, या घटनेमागे आत्महत्येची शक्यता आहे. त्यामुळे ही घटना केवळ अपघात नसून आर्थिक तणावाशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडे तातडीने तपास करण्याची मागणी करत आहेत. याशिवाय, अवैध सावकारीवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगत आहेत. माहिती मिळाल्याप्रमाणे, मासिक कर्ज फेडीच्या दिवशी सावकार बँकेजवळ थेट उभे राहतात आणि कर्जदारांकडून त्यांच्या बुक, एटीएम व चेकबुक ताब्यात घेतात. काही ठिकाणी बँकेचे अधिकारी देखील सावकारांशी संपर्कात असल्याचे बोलले जाते.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, मृत्यूच्या खऱ्या कारणाची शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची सविस्तर पाहणी केली. या घटनेमुळे कामगार चिंतेत असून, भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

