जपतलाईच्या मृत्यूकांडाने सरकारला घेरले! आदिवासी मंत्र्यांसमोरच संतापाचा उद्रेक

0
जपतलाईच्या मृत्यूकांडाने सरकारला घेरले! आदिवासी मंत्र्यांसमोरच संतापाचा उद्रेक

सत्ताधारी गोटातूनच राजीनाम्याची मागणी; माधुरी मडावींचा रुग्णालयाच्या गेटवर जाब


गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उइके बुधवारी गडचिरोली दौऱ्यावर आले. मात्र, रुग्णालयातील विद्यार्थिनींची भेट घेतल्यानंतर मंत्र्यांना नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष सेनापती नंदू नरोटे यांनी जपतलाई घटनेवरून थेट मंत्र्यांनाच सवाल केला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याकडूनच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
दरम्यान, मंत्री डॉ.उईके सामान्य रुग्णालयात येत असताना माजी अधिकारी तथा आदिवासी नेत्या माधुरी मडावी यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांना रोखून जपतलाई प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. घटना घडून तीन दिवस उलटून गेल्यानंतरच दौरा का? असा थेट सवाल त्यांनी केला.
जपतलाई आश्रमशाळेला १०० टक्के शासकीय अनुदान मिळत असतानाही विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा का उपलब्ध नव्हत्या, असा सवाल मडावी यांनी उपस्थित केला. आश्रमशाळेतील अस्वच्छता, सुरक्षेचा अभाव आणि विद्यार्थिनींच्या निवासाच्या अपुऱ्या सुविधांमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केवळ कनिष्ठांवर कारवाई नको
या प्रकरणात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठ जबाबदार अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी मागणी मडावी यांनी केली. आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या प्रकल्प अधिकारी, अतिरिक्त प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित शिक्षण व तपासणी यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
तपासणी करूनही शाळेतील सुरक्षेच्या त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या नसतील, तर त्यामागे कर्तव्यात कसूर झाली का, याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
‘संचालकांवर गुन्हा कधी?’
पत्रकारांनी मंत्र्यांना जपतलाई आश्रमशाळेच्या संचालकांवर गुन्हा कधी दाखल होणार, असा सवाल केला. त्यावर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. मात्र, गुन्हा नेमका कोणाविरुद्ध दाखल झाला, कोणती कलमे लावण्यात आली आणि तपासाची दिशा काय आहे, याबाबत प्रशासनाकडून सविस्तर अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
राज्यभर आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तीन निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये स्वच्छता, निवास व्यवस्था, बेड, आरोग्य सुविधा, सर्पप्रतिबंधक उपाययोजना तसेच सर्पदंश किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध आहे का, याची व्यापक तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
जपतलाई प्रकरणात केवळ कागदोपत्री चौकशी न करता व्यवस्थापनापासून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे.
मंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यातच महायुतीतील घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून राजीनाम्याची मागणी आणि आदिवासी नेत्या माधुरी मडावी यांच्याकडून मंत्र्यांना थेट जाब विचारला गेल्याने जपतलाई प्रकरणाला आता प्रशासकीय चौकशीसोबतच राजकीय रंगही चढला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !