जीवाची पर्वा न करता आत्महत्या करण्यासाठी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या कालीदासला पोलिसांनी दिले जीवदान
चामोर्शी:- जीवाची पर्वा न करता आत्महत्या करण्यासाठी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या कालीदासला पोलिसांनी जीवदान दिले आहे
भेंडाळा येथे सोमवारी (दि. ८) हरणघाट रस्त्यासाठी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आले. या बंदोबस्तासाठी चामोर्शी पोलिसांचे पथक हरणघाट नाक्यावर तैनात होते. अशातच इसमाने वैनगंगा नदीत उडी मारल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक अमूल कादबाने यांनी सहकार्यांना घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी थेट नदीत उडी मारून इसमाचे प्राण वाचविले. कालिदास आभारे (रा. घारगाव, ता. चामोर्शी) असे जीवदान मिळालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक जंगले यांच्यासह त्यांच्या पथकाने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक कादबाने सोमवारी भेंडाळा येथील रास्तारोको आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी पोउनि. गणेश जंगले, पोउपनि. विशाल नल्लावर व पथकासह हरणघाट नाका बंदोबस्ताव होते. यादरम्यान पोउपनि भास्कर मानकर यांच्यासह पथकातील श्यामल पाल, चिडे, झाडे, कुडावले यांना एका अनोळखी व्यक्तीने एक इसम नदी पुलावर चारचाकी वाहन लावून थेट वैनगंगा नदीपात्रात उडी मारल्याची माहिती दिली. पोलिस जवानांनी तत्काळ याची माहिती पोनि. कादबाने यांना माहिती दिली. कादबाने यांचेसह पोउपनि. गणेश जंगले, पोउपनि. विशाल नल्लावर यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोउपनि. गणेश जंगले व पोलिस शिपाई चिडे काठावरील गावात जाऊन डोंगा स्वतः पाण्यात घेत सोबतीला ढिवर समाजबांधवाना घेतले. नीलेश महादेव शेंडे व हरीदास मानकर दोन्ही रा. पारडी ता. सावली जिल्हा चंद्रपूर यांना सोबत घेत पोउनि. जंगले यांनी पुरस्थितीत जीवाची पर्वा न करता डोंगा प्रवाहामध्ये टाकला. डोंगा कालिदास याच्याजवळ जाताच नदीच्या प्रवाहात ते दूर लोटल्या जात होते. तेव्हा चक्क पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले यांनी पाण्यात उडी मारुन त्यास सुखरूप बाहेर काढले

