भरधाव ट्रकने दुचाकीला समोरासमोर धडक, दुचाकीस्वार दोन तरूण जागीच ठार
कुरखेडा (गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या कढोली-गांगुली (घाटी) मार्गावरील खवल्या देवस्थान जवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार दोघे ट्रक खाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना आज, मंगळवार २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, एकाचा मृतदेह मुख्य मार्गावर छिन्न-विच्छिन्न झाला. अपघातात प्रज्वल प्रल्हाद अलाम वय २५ वर्षे व त्याचा मित्र सुमित गुणाजी उईके वय २२ वर्षे दोघेही रा.नरचूली ता. आरमोरी, जि. गडचिरोली अशी मृतकांची नावे आहेत.
माहितीनुसार, प्रज्वल व त्याचा मित्र सुमित हे दोघेही आज मंगळवारी एमएच ३३ एजी ९२५६ क्रमांकाच्या दुचाकीने नरचूली येथून कुरखेडा तालुक्याच्या पळसगांव येथे राहणाऱ्या बहिणीची भेट घेण्याकरीता निघाले होते. अश्यातच कढोलीकुरखेडा मुख्य मार्गावरील गांगुली नजीक असलेल्या खवल्या देवस्थानाजवळ विरूद्ध दिशेने छत्तीसगड वरून येणारा ट्रक क्रमांक सीजी ०४ एनक्यू ८३१७ याची दुचाकीला समोरासमोर धडक बसली. यावेळी दोन्ही युवक ट्रक खाली आल्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला व त्यांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले. अपघातानंतर ट्रकने घटणास्थळावरून पळ काढला. मात्र, वैरागडजवळ गावकऱ्यांनी ट्रक व चालकाला अडवत पोलिसांना माहीती दिली. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरीता कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

