घर बांधकाम करण्यासाठी आलेल्या इसमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; न्यायालयाने केली रवानगी कोठडीत
मूल : घर बांधकाम करण्यासाठी आलेल्या इसमाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मूल तालुक्यातील एका गावात घडली. रितेश राजू बाग ५५ वर्ष रा. खरबी, ता. कुही, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला २७ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. रितेश हा घर बांधकामाच्या अनुषंगाने मूल तालुक्यातील एका गावात गेला होता. यादरम्यान त्याने त्या घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मागील आठवड्यात तो त्या मुलीला घेऊन दुसऱ्या गावी गेला होता. येथे त्याने मुलीवर अत्याचार केला. दोन ते तीन दिवस तिला स्वतःकडे ठेवल्यानंतर त्याने तिला मूलला आणून सोडून दिले. दरम्यान त्या मुलीने पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनह ६४ (१), ६४ (२), (एम) सहकलकम ४, ६ पोक्सो, ॲट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करून रितेशला अटक केली. मुख्य लोकअभिरक्षक ॲड. विनोद बोरसे यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने न्यायालयीन कोठडी सुनावली. प्राथमिक तपास ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात महीला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव करीत आहेत.

