डी. के.साखरे यांना "आदर्श संघर्ष योद्धा" पुरस्कार जाहीर
मंगळवेढा : थोर साहित्यिक डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा २०२५ चा "आदर्श संघर्ष योद्धा" पुरस्कार दलीत अत्याचार विरोधी कृती समितीचे, संस्थापक अध्यक्ष व दैनिक अचूक निदान चे संपादक डी. के. साखरे यांना जाहीर झाला आहे.अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आकाश दामू अवघडे यांनी दिली.शुक्रवार दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मंगळवेढा येथे एका शानदार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मंगळवेढा येथील साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ साखरे हे समाजकार्यात अग्रेसर असून विद्यार्थी अवस्थेपासून चळवळीत सक्रीय आहेत.अन्याय कुठेही होवो व कुणावरही होवो अन्यायग्रस्तांच्या बाजूने थेट भिडणारा म्हणून त्यांची ओळख आहे.मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठीचा नामांतर लढा,रिडल्स इन हिंदू इझम संघर्ष, मंडल आयोगची अंमलबजावणी, छत्रपती शाहू महाराज व डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच बेरोजगारी, वाढती महागाई आदि मागण्या त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडे लावून धरल्या आहेत.
महाराष्ट्रात व देशात कोठेही अन्याय अत्याचार झाल्यास जात पात व धर्म न पाहता त्यावर प्रथम ते आवाज उठवतात.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आज काल पुरस्काराचा बाजार मांडलेला असताना या मंडळाने अर्ज व प्रस्ताव न घेता सामाजिक सर्वे करून माझ्यासहित अन्य व्यक्तींना जे पुरस्कार जाहीर केले आहेत त्यामुळे ग्राउंड लेव्हल ला काम करणाऱ्या आम्हा सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना एक नवीन ऊर्जा मिळणार आहे.
या प्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक खंडू खंदारे, मल्हारी कांबळे, मंडळाचे अध्यक्ष आकाश दामू अवघडे, अंकुश (अण्णा) अवघडे, नागेश सत्यवान अवघडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे त्यांनी आभार मानले.
साखरे यांच्या सारख्या योग्य व्यक्तीला पुरस्कार जाहीर केल्या बद्दल डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.