बंदूकीचा धाकावर ट्रक चालकास लुटणाऱ्या चोरांना शोधले अवघ्या एका दिवसात
आरोपींकडून 02 देशी बनावटी बंदुका व 11 नग काडतूस केले जप्त
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यात जबरी चोरींसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतर्कता ठेवण्याचे तसेच गुन्हेगारांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेले आहेत. यावरुन सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकास बंदूकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींना सावरगाव पोलीसांनी दिनांक 22/07/2025 रोजी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, ट्रक चालक नामे रामभरोस सिताराम हा सावरगाव-मुरुमगाव रोड येथे ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेला असताना रात्री 01.30 ते 02.00 वाजता दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबीनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली. परंतु डिझेल काढता न आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या छातीवर व डोक्यावर दोन बंदुक ठेवून फिर्यादीचा मोबाईल जबरीने काढून घेतला व कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले. सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन पोलीस स्टेशन मुरुमगाव येथे दिनांक 21/07/2025 रोजी अप. क्र. 0023/2025 कलम 309 (4), 311, 351 (3) भान्यासं, सहकलम 3, 25 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलीसांना दिले होते. यावरुन पोमकें सावरगाव येथील पोउपनि. विश्वंभर कराळे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने व साक्षीदारांच्या जबाबावरुन मौजा गजामेंढी ता. धानोरा जि. गडचिरोली येथून तीन संशयीत आरोपी नामे 1) अशोक सुखराम बोगा, वय 30 वर्षे, 2) घुमनसाय बैजुराम गावडे, वय 33 वर्षे, 3) सुकालु आसाराम कोमरा, वय 32 वर्षे, तीघेही रा. गजामेंढी, ता. धानोरा, जि. गडचिरोली ताब्यात घेतले. यादरम्यान पोलीसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले व सदर गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील बसंतकुमार कल्लो याने दुरुस्तीसाठी आपल्याकडे दिले असल्याचे सांगितले. यावरुन गडचिरोली पोलीसांनी बसंतकुमार कल्लो, वय- 41 वर्षे, रा. नवागाव कोंडल, ता. दुर्ग, जि. कांकेर, छत्तीसगड याच्यासह सर्व चारही आरोपीस दिनांक 22/07/2025 रोजी अटक करुन आरोपीतांना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धानोरा यांच्या समक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने चारही आरोपींना दिनांक 26/07/2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपींकडून 02 नग देशी बनावटीच्या बंदुक, 11 नग काडतुस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन व गुन्ह्यात वापलेली मोटारसायकल जप्त केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. विश्वंबर कराळे, पोमकें सावरगाव हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा श्री. जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें सावरगावचे प्रभारी अधिकारी पोउपनि. विश्वंबर कराळे, पोउपनि. राजेंद्र कोळेकर, पोहवा/वानखेडे, नापोअं/तुलावी, पोअं/काळबांधे, मपोअं/श्रीरामे, लेकामी व करसायल यांनी केलेली आहे.

