संभाजीनगर:-
धनलाभाच्या हवास्यापायी आईने स्वतःच्या वीस वर्षांच्या मुलीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर मधील फुलेनगरमध्ये उघडकीस आली असून १७ ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत पीडित मुलीने सोमवारी (२१ ऑगस्ट) सिडको पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून तिच्या जबानीनुसार तांत्रिक शकुंतला अहिरे व आई पार्वती हुलमुख यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वीस वर्षीय सुनीताच्या वडिलांचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले. आई व भावासह ती फुलेनगरमध्ये राहते. एका खासगी कंपनीत कंत्राटी काम करून ती शिक्षण घेते. १७ ऑगस्ट रोजी दिवसभर कंपनीत काम करून घरी आल्यानंतर सुनीता रात्री झोपी गेली. पहाटे साडेचार वाजता मात्र तिला चटक्यांची जाणीव झाल्याने खडबडून जागी झाली. तेव्हा तिचे पांघरुण जळत होते. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची आईच तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होती. तिची आरडाओरड ऐकून भावाने तिच्या दिशेने तत्काळ धाव घेतली.
मुलगी जळत होती, तरीही आई स्तब्ध :
सुनीताच्या केसांचा भाग, खांद्यासह शरीरावर आगीमुळे जखमा झाल्या होत्या. वेदनांमुळे ती रडत होती. मात्र, तिची आई कोपऱ्यात स्तब्ध उभी होती. तू जर मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल, तुझ्या मुलाचे चांगले होईल, असे मला शकुंतला आहेर हिने सांगितल्याचे तिने सांगितले. मिसारवाडीत राहणारी शकुंतला काळ्या जादुचा दावा करत अनेकांना फसवते. सुनीताची आई नेहमी तिच्याकडे जाऊन जादूटोण्यासारखे प्रकार करायची.

