समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात ,२६ जणांचा मृत्यू.
बुलढाणा:-
समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र थांबायचं नाव घेत नाही तर बुलढाणा जिल्ह्यातून जाणाच्या समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक या बसचा टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी जिवीत हानी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पोल दुभाजकाला धडकून पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट झाला. त्यात प्राथमिक अंदाजानुसार २६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही बस काही काळ कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजा जवळ असलेल्या इंटरवेज वरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.

