स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यात यावे व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
कोनसरी परीसरातील स्थानिकांची मागणी
चामोर्शी : (वैनगंगा वार्ता न्यूज) दिनांक: 05/04/2023 कोनसरी येथील लोह खनिजावर आधारित उद्योग प्रकल्पात कोनसरी लगत असणान्या गावातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे व अन्याय ग्रस्त शेत जमीन मालकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी कोनसरी परीसरातील स्थानिकानी केली आहे. या मागण्याचे निवेदन दिनांक 5 एप्रिल बुधवारी
जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसिलदार चामोर्शी, व कोनसरी येथील कंपनी प्रशासनाला दिले. व या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर
उतरून जनआंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोनसरी ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील लॉईड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड च्या लोहखनिज प्रकल्पात स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देणार असल्याची हमी कंपनी प्रशासनाने दिली होती. यामुळे कोनसरी परिससरातील आष्टी, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, कडोली, जैरामपुर, मुधोली, रामपूर, सोमणपल्ली, रामकृष्णपुर, येनापूर, लक्ष्मणपुर धर्मपुर, बहादूर, गणपुर, इल्लुर, ठाकरी, मार्कडा कंसोबा, व परिसरातील अन्य गावातील अनेक आय टी आय व ईतर बेरोजगार युवकामध्ये रोजगाराबाबत आशेचे किरण निर्माण झाले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र परिसरातील बेरोजगार युवकांना भरतीत कुठल्याही प्रकारचे प्राधान्य न देता बाहेर जिल्ह्यांतील व राज्यातील कामगारांना रोजगार दिल्या जात आहे. ही स्थानिक जनतेची दिशाभूल असून याविरोधात स्थानिक बेरोजगार युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. या कंपनीतील रोजगार भरतीत परिसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारात डावलण्याचा असाच प्रयत्न होत राहिल्यास फार मोठे जनआंदोलन उभे झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच परिसरातील जमिनीचे अधिग्रहनाच्या प्रक्रिया करताना स्थानिक जमीन मालकाशी कोणतीही चर्चा न करता काही मध्यस्था मार्फत दिशाभूल करण्यात आली व जमिनीचा व्यवहार करण्यास ग्रामस्थांचा होकार असल्याचे या पत्रात नमूद केले. ही एक प्रकारची स्थानिक जमीन मालकांची फसवणुक असून जमीन मालकांना विश्वासात न घेता असा प्रकार घडू नये.
स्थानिक युवकांना रोजगार देण्याच्या हमीचे कंपनी प्रशासनाने पालन करून स्थानिकांच्या पुढील मागण्या त्वरित मान्य
परीसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना प्राधान्य देण्यात यावे.
जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया पार पाडताना जमीन मालकांशी मद्यस्थामार्फत चर्चा न करता थेट चर्चा करण्यात यावी
अधिग्रहण करण्यात येणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला
देण्यात यावा.या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुटपुंजे वेतन न देता पगारवाढ करण्यात यावी.
दिशाभूल व फसवणूक करुन जमीन अधिग्रहण करू नये.
या मागण्याचे निवेदन कोनसरी परिसरातील स्थानिकांच्या प्रतीनिधीनी जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसिलदार चामोर्शी, व कोनसरी येथील लॉयड मेटल्स च्या कंपनी प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अनखोडा येथील उपसरपंच वसंत चौधरी, कढोली येथील सरपंच जितेंद्र हुलके, जैरामपुर येथील माजी उपसरपंच हरीशभाऊ निखाडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नेमाजी घोगरे, छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचे अध्यक्ष पवन रामगीरकर, छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचे सचिव संदीप तिवाडे आदी उपस्थित होते.

