झाडीपट्टीची सुन सांभाळा पाटलीनबाई पोहचली मध्यप्रदेशात
गर्दीने गाठला उच्चांक
पब्लिक संभालो मंडलवाले भाई मान्यवरांनी व्यक्त केले मत
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
देसाईगंज दि.२२
झाडीपट्टी रंगभूमी ही समृद्ध रंगभूमी असून येथिल नाट्य वेड सर्वश्रृत आहे .येथिल हौसी नाट्य रंगभूमीचे रुप पालटून तिने आता व्यावसायिक नाटय रंगभूमीचे नवे रुप धारण केले आहे. दरवर्षी दिवाळी नंतर खऱ्या अर्थाने झाडीपट्टीतील खेड्यापाड्यात झाडीपट्टी नाट्य महोत्सव कुठल्या ना कुठल्या (मंडई,नववर्ष,शंकरपट ) निमित्तानं होत असते. त्यामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीच्या व्यावसायिक नाटकांना मागणी असते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे झाडीपट्टी नाट्य रंगभूमीच्या व्यावसायिक नाट्य पुरविण्याचे केंद्र बनले आहे. झाडीपट्टीतील नाटकांनी अनेकांवर आजवर आपली छाप व भूरळ पाडली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात इंग्रजांनाही झाडीपट्टीतील नाटकाचे वेड लागले होते. केवळ विदर्भात सादर होणारी नाटके आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून आज आपल्या देशातील इतर राज्यातही सादर होऊ लागली असून झाडीपट्टीची सुन सांभाळा पाटलीनबाई ही नाटक मध्यप्रदेशात पोहचली आहे.
मौजा छतेरा तालुका खैरलांजी जिल्हा बालाघाट येथे नुकतेच राजसा रंगभुमी वडसा देसाईगंज यांचे देवेंद्र लुटे लिखित , हिरालाल पेंटर (सहारे) यांनी दिग्दर्शन केलेली सुन सांभाळा पाटलीनबाई ही नाटक सादर झाली. या नाटकाचे सुत्रधार म्हणून पूजा पिंपळकर यांनी काम पाहीले असून हिरालाल पेंटर (सहारे), यशवंत चोपडे, विक्रम मोरे, विशाल सहारे, अनिल ढोरे, योगी (योगीनाथ) सूर्यवंशी, पुरुषोत्तम ढोरे, मिस. निशा धोंगडे, मिस. शुभांगी राऊत, मिस. सपना आवळे ,सिने अभिनेत्री पुजा पिंपळकर यांनी भूमीका साकारली आहे. संगीत साथ आनंद काशीवार, राधेश्याम दोनाडकर, चेतन बावणे यांनी दिली .ध्वनी व प्रकाश योजना धनकर साउंड सर्व्हिस आरमोरी तर नेपथ्य म्हणून बारापात्रे आर्ट आरमोरी ,नाट्य यशस्वीतेसाठी प्रयोग सहाय्यक म्हणून प्रमोद राऊत, सुनिल दुमाने, गजेंद्र सहारे, माणिकलाल मेश्राम यांनी काम पाहिले.
सदर नाटक पाहण्यासाठी दहा हजार पेक्षाही जास्त प्रेक्षक उपस्थित होते. झाडीपट्टीवर आजवर सादर झालेल्या सर्वच नाटकांचा गर्दीचा उच्चांक याठिकाणी तोडला गेल्याने तोबा गर्दी बघता नाटकाच्या उद् घाटन सोहळ्या प्रसंगी एका मान्यवराने आपले मनोगत व्यक्त करतांना सुन सांभाळा पाटलीनबाई ऐवजी "पब्लिक संभालो मंडलवाले भाई " असे विनोदाने म्हटल्याचे नाट्य निर्माता , दिग्दर्शक व विनोदी कलावंत हिरालाल पेंटर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगीतले. नाटकाला उपस्थित बहुतांश प्रेक्षक हिंदी भाषीक असूनही संपूर्ण रात्रभर मराठी भाषेतील व झाडीबोलीतील "सुन सांभाळा पाटलीनबाई "या नाटकाचा मध्यप्रदेशच्या प्रेक्षकांनी आस्वाद घेतला , हे मात्र विशेष !

