शेतशिवारात जुगार सुरू असतानाच पोलिसांचा छापा १२ इसम जेरबंद ;२३ हजारांचा मुद्देमाल जप्त
गोंडपिपरी :- शेताशिवारात जुगार सुरू असतानाच गोंडपिपरी पोलिसांनी छापा टाकून १२ इसमांना जेरबंद केले आहे. भास्कर झाडे यांच्या शेतात बाभळीच्या झाडाखाली ५२ ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळला जात होता. या कारवाईत रोख रकमेसह ताशपत्ते असा एकूण २३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत बंडू सुकरू हुलके (६०), संजय राजेश्वर कुंचेवार (६१), विनायक पैकन्ना पुण्याप्रेड्डीवार (६१), प्रदीप पोचुजी झाडे (४७), उद्धव लिंगा हुलके (५८), संदीप नानाजी झाडे (४०), सचिन सत्यवान झाडे (३८), राजू गंगाराम जकुलवार (३५), रमेश शामराव मुक्कावार (६४), विनोद गुलाब लभाने (५३), रवींद्र मुरलीधर साखलवार (५६) आणि वसंत रामभरोस चव्हाण (५८) यांचा समावेश आहे.
सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
८ नोव्हेंबर रोजी गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे पथक शहरात गस्तीवर असताना गुप्त माहितीदाराकडून शेतात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी १२ जण गोलाकार बसून पैशांची बाजी लावताना आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून डावावर लावलेली १२ हजार रुपये रोख रक्कम, आरोपींकडील ११ हजार ५०० रुपये आणि ५२ ताशपत्ते असा एकूण २३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास कोवे, पोलीस अंमलदार गणपती खोबरे, प्रमोद दुर्गे आणि चालक पोलीस उपनिरीक्षक पुनेश्वर कुळमेथे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

