सेवाव्रती तुकारामजी पवार यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी - खा. प्रतिभाताई धानोरकर
पिट्टीगुडा येथे लावणीसम्राज्ञी गौतमी पाटील लावणी कार्यक्रमात जल्लोष
गडचांदूर: जिवती तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून शिक्षणाचा प्रसार करणारे आणि आपल्या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गल्ली ते दिल्ली पर्यंत पोहोचून राष्ट्रपतीशी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणारे सेवाव्रती म्हणजेच तुकारामजी पवार होय. त्यांनी बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या माध्यमातून थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाप्रति कटीबद्ध असणारे सेवाव्रती तुकारामाजी पवार यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे असल्याचे प्रतिपादन लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. त्या स्वर्गीय खेमाजी पवार (नाईक )यांच्या तिसाव्या पुण्यतिथी निमित्त पिट्टीगुडा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. महोत्सवाचे उद्घाटनच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकरराव कुकडे, प्रमुख अतिथी माजी आ.सुभाष भाऊ धोटे ,सती सामत देवस्थान वडांगळी, जि.नासिकचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, सोहळ्याचे आयोजक श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तुकारामजी पवार, सौ .सुनिता पवार ,निमंत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. पंकज पवार, स्वप्निल पवार प्रामुख्याने उपस्थित होते. माजी आ. सुभाष भाऊ धोटे यांनी तुकारामजी पवार यांनी दुर्गम भागात केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय स्वरूपाचे असून भौतिक सुविधामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे जीवन घडले. दरवर्षी वडिलांच्या पुण्यस्मरणा निमित्त महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, प्रबोधनकारांच्या कार्यक्रमांचे
भव्य आयोजन करून परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी खेमाजी पवार नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचलन प्रा. राजकुमार मुसणे यांनी तर प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य निमंत्रक डॉ. पंकज पवार यांनी केले उपस्थितांचे आभार प्रा. वाघमारे यांनी मानले. स्वर्गीय खेमाजी पवार नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित लावणी महोत्सवात महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या बहारदार नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत आणली. तरुणाईने तर माहूआयोजक तुकारामजी पवार व डॉ. पंकज पवार यांनी गौतमी पाटील सह अकरा नृत्यांगनांचा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार केला.
महाराष्ट्राची शान असलेली उत्कृष्ट नृत्यांगना गौतमी पाटील यांनी दिलखेचक अदानी रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. शिवाय तिच्यासोबत असलेल्या अकरा नृत्यांगनाचा बहारदार लावणी कार्यक्रम चांगलाच रंगला.पिट्ठीगुडा येथील खेमाजी नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमास परिसरातील प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शविली. कार्यक्रम पोलीस विभागाच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण पवार कुटुंबीयांनी प्रचंड परिश्रम घेतले.

