अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर आष्टी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन घेतले मागे

0
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानंतर आष्टी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन घेतले मागे

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी यांची आंदोलकांशी चर्चा; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत


गडचिरोली, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका) : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टी येथे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे चक्काजाम व ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि मुख्यमंत्र्यांचे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवले. या चर्चेनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

येणापूर–जयरामपूर परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात १३ गावांतील शेतकऱ्यांनी आष्टी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वर आंदोलन सुरू केले होते. प्रकल्पाच्या भूसंपादनातून त्यांची जमीन वगळण्याची त्यांची मागणी होती. या आंदोलनामुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि दक्षिण गडचिरोलीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची दखल घेऊन विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांना आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या व म्हणणे ऐकून घेतले. तसेच आंदोलन मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महामार्गावरील आंदोलन समाप्त केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत संबंधित भूसंपादन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली असून, सध्या त्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आदल्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.

आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत आंदोलकांना घरापर्यंत पोहोचून देण्याची व्यवस्था करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !