आष्टी तालुका निर्माण संघर्ष समितीच्या वतीने २ नोव्हेंबरला आष्टी बंदचे आयोजन
आष्टी : शासनाने २२ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकातून आष्टी हे गाव अप्पर तहसीलच्या यादीतून वगळले आहे. या निषेधार्थ २ नोव्हेंबरला आष्टी येथील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी तालुका निर्माण संघर्ष समितीचे घेतला आहे.
शासनाने दरम्यानच्या काळात एप्रिल महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी, मालेवाडा, कसनसूर, पेंढरी, असर अल्ली, जिमलगट्टा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी मान्यता दिली होती. त्यानुसार २२ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात आष्टी गावाचा अपर तहसील कार्यालयाच्या यादीत नाव असणे अपेक्षित होते. मात्र, २२ सप्टेंबरला काढलेल्या परिपत्रकातून आष्टी वगळण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे
या परिपत्रकाच्या निषेधार्थ २ नोव्हेंबरला आष्टीची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीने घेतला आहे.
आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, याकरिता २००२ पासून मागणी सुरू आहे. यासंदर्भात वारंवार आंदोलन करून शासनाला निवेदनही सादर केले आहे. या मागणीनुसार शासनाने एप्रिल महिन्यात अप्पर तालुक्याच्या यादीत आष्टीचा समावेश केल्याने संघर्ष समितीच्यावतीने शासनाने अभिनंदनही करण्यात आले. मात्र, २२ सप्टेंबरला काढलेल्या परिपत्रकात आष्टीचा नावच नसल्याने आष्टीवासीयांमध्ये शासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ आष्टी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

