प्रस्तावित अप्पर तालुका कार्यालयांच्या यादीतून आष्टीचे नाव वगळल्याने संताप; आमदार मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत पुन्हा समाविष्ट करण्याबाबत निवेदन

0
प्रस्तावित अप्पर तालुका कार्यालयांच्या यादीतून आष्टीचे नाव वगळल्याने संताप; आमदार मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत पुन्हा समाविष्ट करण्याबाबत  निवेदन


चामोर्शी, दि. ३१ ऑक्टोबर : शासनाच्या प्रस्तावित अप्पर तालुका कार्यालयांच्या यादीतून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने आष्टी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी (दि. ३१) चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत आष्टीच्या अप्पर तालुका निर्मितीच्या मागणीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
आष्टी हे परिसरातील महत्त्वाचे केंद्र असून, आसपासच्या अनेक गावांतील नागरिक विविध शासकीय व प्रशासकीय कामांसाठी आष्टीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आष्टी येथे अप्पर तालुका कार्यालय स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, प्रस्तावित अप्पर तालुका कार्यालयांच्या यादीतून आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आष्टीचे भौगोलिक स्थान, परिसरातील गावांची संख्या, नागरिकांची प्रशासकीय गरज आणि दळणवळणाच्या सुविधा लक्षात घेऊन शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. तसेच प्रस्तावित अप्पर तालुका कार्यालयांच्या यादीत आष्टीचे नाव समाविष्ट करून आष्टीवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी आमदार मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत आष्टी अप्पर तालुका निर्मितीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. आष्टीला अप्पर तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या मागणीसाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते व्यंकटी बुर्ले,राष्ट्रवादी काँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष डॉ. हेमंत भाकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा सौ. पुष्पा बुर्ले,डी. एम. बारसागडे, संजूभाऊ पंदिलवार, बेबीताई बुरांडे, विठ्ठल आचेवार, पवन रामगिरकर, हरिदास मेश्राम, विनोद येलमुले, सेवानिवृत्त प्राचार्य दीपक रॉय, आसाराम रायसिडाम, भगवान धोटे, देवा बोरकुटे, नौशाली दुर्गे, मायाबाई ठाकूर, हेमलता बोमनवार, वेदिका खरबनकर, राणी उंदीरवाडे, साईनाथ बोमनवार,कैलास दुर्गे, दीपक ठाकूर, युगदेव सिडाम, प्रदीप गाडगे, राजेश दिवसे, मनोज डोरलीकर, आशिष ठाकूर, अभय मडावी, नेताजी येलेकर यांच्यासह बहुसंख्य महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते.
*प्रस्तावित अप्पर तालुका कार्यालयांच्या यादीत आष्टीचा समावेश करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक एकवटले असून, शासन या मागणीची कितपत दखल घेते, याकडे संपूर्ण आष्टी परिसराचे लक्ष लागले आहे.*
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !