मेघराज्याच्या कृपेनंतरही आष्टी येथील आंदोलनाची धग कायमच

0
मेघराज्याच्या कृपेनंतरही आष्टी येथील आंदोलनाची धग कायमच




एमआयडीसी जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन तीव्र;  भर पावसातही आंबेडकर चौकात ठिय्या सुरुच

‘मुख्यमंत्री भेट नको, एमआयडीसी रद्द करा’—शेतकऱ्यांचा ठाम निर्धार; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

आष्टी : एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, आज  पावसाची पर्वा न करता शेतकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या देऊन आपल्या जमिनी वाचविण्याची मागणी करत राहिले.

दि . २ नोव्हेंबर ला सायंकाळी ३.०० वा शेतकऱ्यांनी आंबेडकर चौकात रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक रोखली आज २६ तासांचा अवधी लोटला तरीही एमआयडीसीच्या नावाखाली शेतजमीनी अधिग्रहित करू नये, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी सुरुच ठेवली आहे 

पावसातही आंदोलनाची धग कायम

 आज आंदोलनादरम्यान पावसाला सुरुवात झाली, मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. पावसात भिजतही शेतकऱ्यांचा निर्धार कायम राहिला. ‘आमची शेती, आमची जमीन आणि आमचा उदरनिर्वाह वाचवा’, असा आक्रोश शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे 

दोन दिवसांपासून वाहतूक विस्कळीत; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

 आष्टी येथे झालेल्या रास्ता रोकोमुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होतांना दिसूत येत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

‘मुख्यमंत्री भेट नको, आधी एमआयडीसी रद्द करा!’

दरम्यान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अपेक्षित भेट घडून न आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

आता ‘मुख्यमंत्री भेट नको, एमआयडीसी रद्द झाली पाहिजे’ या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचे आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. केवळ आश्वासन नको, तर जमीन अधिग्रहणाचा निर्णयच रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

गणपूर, जयरामपूर आणि मुधोली परिसरातील शेतकऱ्यांनी आष्टीकडे मोर्चा वळवत आंदोलनाची तीव्रता वाढविल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जमीन अधिग्रहणाचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आता शासन आणि प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते, एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द होणार की आंदोलन आणखी पेटणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !