येणापूर - अड्याळ परिसरात अवैध दारूचा महापूर ; अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
येनापूर :- चामोर्शी तालुक्यातील येणापूर - अड्याळ व परिसरातील विविध गावांमध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे, अनेक ठिकाणी खुलेआम दारूची विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने परिसरातील सामाजिक वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
येणापूर परिसरात विशेषतः सायंकाळच्या वेळेत अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
अवैध दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे परिसरातील अनेक तरुण दारूच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दारूच्या व्यसनामुळे काही कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद आणि इतर सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तींकडून दारूवर होणारा खर्च वाढल्याने अनेक कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
दारूच्या व्यसनामुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येऊ नये, यासाठी अवैध दारू विक्रीला आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

