अवैध वन्यप्राणी शिकारीवर वनविभागाचा बडगा
दोघांवर वनगुन्हा दाखल
वैनगंगा वार्ता १९
आष्टी : आलापल्ली वनविभागांतर्गत मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील गुंडापल्ली उपक्षेत्र, बहादूरपूर नियतक्षेत्रातील सुभाषग्राम येथे ४ ऑक्टोबर २०२६ रोजी वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारी प्रकरणी वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी संशयावरून दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत दुर्लभ निर्मल ढाली, रा. सुभाषग्राम आणि विश्वजित रवींद्र रॉय, रा. तुमडी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वन्यप्राणी शिकारीशी संबंधित असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उप वनसंरक्षक शैलेश मीना आणि सहाय्यक वनसंरक्षक मोहम्मद आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे, मार्कंडा (कं.), गुंडापल्लीचे क्षेत्र सहाय्यक आर. एल. बानोत, तसेच वनरक्षक एस. जी. राठोड, एन. डी. सोनवणे, सुनील खोब्रागडे आणि बी. के. लिपटे यांच्या पथकाने कारवाई केली.
वन्यप्राण्यांची अवैध शिकार, वन्यजीवांची तस्करी किंवा वन्यजीवांशी संबंधित कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनी वनविभागास सहकार्य करावे. परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारीसह कोणतीही संशयास्पद अथवा बेकायदेशीर हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-

